‘मारेकर्‍यांना फाशी द्या’शुभमच्या आई-वडीलांची मागणी

शुभमचे मारेकरी हे अल्पवयीन मुळात नाहीतच. त्यामुळे  शुभमच्या मारेकर्‍यांना  फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी शुभमच्या आई-वडिलांनी केली.  शुभमच्या आईवडिलांनी काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना शोक अनावर झाला होता.
    आपल्या  मुलाने काय गुन्हा केला होता? ज्यामुळे त्याला आपला जीव गमावावा लागला, असा सवाल उपस्थित करत त्यांनी हा खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासारख्या न्याय मिळवून देणार्‍या वकिलाची  नियुक्ती करावी, अशी मागणी  केली. तसेच गृहमंत्री आर आर पाटील यांची भेट घेणार असल्याचेही शुभमच्या आई-वडीलांनी सांगितले.
     पुण्यातल्या प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम शाळेत शिकणार्‍या शुभम शिर्के याची त्याच्याच मित्रांनी खंडणीसाठी हत्या केली होती.  या प्रकरणी पोलिसांनी शुभमचा मित्र अमित नायरसह आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ते दोघेही अल्पवयीनच आहेत. क्राईम सीरिअलमध्ये दाखवलेला थरार पाहुन शुभमचं त्यांनी अपहरण केले आणि दिघीजवळ बोलावून जवळच्या जंगलात नेवून त्याचा पट््ट्याने गळा दाबून खून केला. त्याआधी शुभमच्या वडिलांकडून त्यांनी १५ हजारांची खंडणी वसूल केली होती. तुमचा मुलगा तुम्हाला मिळेल, असेही त्यांनी शुभमच्या वडीलांना सांगितले होते. मात्र शुभम रात्रीनंतरही घरी परत न आल्याने शेवटी वडिलांनी पोलिस ठाणे गाठले. मात्र, दुसर्‍या दिवशी शुभमचा मृतदेह पोलिसांना मिळाला. आपला १५ वर्षाचा मुलगा गमावल्यामुळे शिकर्े कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मित्राने मित्राची हत्या केल्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली. आता या अल्पवयीन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी शुभमच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी केली आहे.