एनकेपी साळवे अनंतात विलीन

नागपूर, दि.२ – माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे माजी अध्यक्ष एनकेपी साळवे यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी नागपुरातील जरीपटका परिसरातील ख्रिस्ती स्मशानभूमीत संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवार सकाळी त्यांचे दिल्लीत दुःखद निधन झाले होते.
  रविवारी रात्री उशिरा विमानाने साळवे यांचा मृतदेह नागपुरात आणल्यावर सिव्हिल लाईन्स परिसरातील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आला होता. सोमवारी मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने जावून त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. अंत्यदर्शन घेणार्‍यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री अंबिका सोनी आणि प्रफुल्ल पटेल, नागपूरचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांचा समावेश होता.सोमवारी सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानावरुन सदर परिसरातील ऑल सेंटस कॅथेद्रल या ख्रिस्ती चर्चमध्ये नेण्यात आल्यावर त्याठिकाणी ख्रिस्ती परंपरेनुसार प्रार्थनासभा घेण्यात आली.
  यावेळी ख्रिस्ती धर्मगुरुंसह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि अंबिका सोनी, रोजगार हमी योजना मंत्री डॉ. नीतीन राऊत, अन्न नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, उर्जा राज्यमंत्री  राजेंद्र मुळक, काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी खा. मोहन प्रकाश, खा विलास मुत्तेमवार, खा. अजय संचेती, नागपूरचे महापौर अनिल सोले, आमदार एस. क्यु. झामा, वर्धेचे खासदार दत्ता मेघे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले आणि रणजित देशमुख, माजी खासदार नरेश पुगलिया, माजी मंत्री अनिस अहमद, मधुकर किमतकर, माजी आमदार गिरीश गांधी, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि नागरीक मोठ्या संख्येत उपस्थित होते. विशप पॉल दुपारे यांच्या नेतृत्वात झालेल्या प्रार्थनासभेत मान्यवरांनीही  श्रद्धांजली वाहिली.

Leave a Comment