गोव्यात दर ११ रूपयांनी उतरून पेट्रोल ५६ रूपये प्रती लिटर

पणजी, दि. २- गोव्यातील नवनिर्वाचित पर्रीकर सरकारने सोमवारपासून पेट्रोलचे दर ११ रूपयांनी खाली आणल्याने सोमवार सकाळपासून राज्यातील विविध पेट्रोल पंपांवर वाहनांची एकच झुंबड उडाली. दुचाकी तसेच चार चाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा पणजी शहरात तसेच इतर भागांमध्ये पाहायला मिळाल्या. पेट्रोल वरील व्हॅट २२ टक्क्यांवरून ०.१ टक्क्यांवर आणणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी सत्तेवर आल्यास पेट्रोलचे दर ११ रूपयांनी कमी करण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने दिले होते. त्यानुसार सत्तेवर येताच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २६ मार्च रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोलचे दर २ एप्रिलपासून कमी करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा प्रत्यक्षात आणून आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातील सर्वात मोठे आश्वासन भाजपने पाळले आहे.
  पेट्रोलचे दर उतरणार याची कल्पना असल्याने सोमवारी सकाळीपासूनच लोकांनी विविध पंपांवर रांगा लावल्या. यातील प्रत्येकजणाचा रोख आपल्या वाहनांच्या टाक्या भरून घेण्याकडे होता. परिणामी पेट्रोल टाकण्याची प्रक्रिया लांबत गेली आणि रांगाही वाढत गेल्या. राज्यातील अनेक पंपांवर दुपारपर्यंत पेट्रोल संपल्याचे चित्र होते. परंतु तेल कंपन्यांनी लागलीच जादा टँकर पाठवण्याची सोय केल्याने पेट्रोल तुटवडा फारसा जाणवला नाही. पेट्रोलचे दर कमी करण्यापूर्वी गोव्यात पेट्रोल प्रतिलीटर ६५ रूपये होते. मात्र, हिशेब ठेवण्यासाठी नाममात्र ०.१ ठेवून उर्वरीत सर्व २२ टक्के व्हॅट काढून टाकल्याने आता हा दर ५६ रूपये प्रतिलीटर इतका खाली आला आहे. पेट्रोलवरील व्हॅट काढल्याने राज्याला वर्षाकाठी १४० ते १७० कोटी रूपयांचा आर्थिक महसूली फटका बसणार आहे, परंतु अन्य उपायांद्वारे तो भरून काढला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.