जिप सदस्य सुषमा कलाने यांचे अपहरण

अमरावती, दि. २ – अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. येथून शिवसेनेकडून निवडून आलेल्या २३ वर्षीय जिल्हा परिषद सदस्या सुषमा कलाने यांचे काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयातून जबरदस्तीने अपहरण करून अज्ञात स्थळी नेल्याची तक्रार शिवसेनेचे आमदार अभिजित अडसूळ यांनी परतवाडा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
  अमरावती जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी निवडणुका होत आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत या आधी काँग्रेसला वगळून भाजपा, शिवसेना, राकाँ आणि प्रहार संघटना एकत्र आले होते. त्यामुळे काँग्रेसची चांगलीच गोची झाली. स्थायी समितीत तरी आपल्याला काही तरी मिळावे या धडपडीतून हे अपहरणाचे प्रकरण घडले असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेच्या सुषमा कलाने या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना डॉ. प्रफुल्ल भन्साली यांच्या रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे आई वडील सुद्धा होते.
  मंगळवारी स्थायी समितीची निवड असल्याने शनिवारी आ. अडसूळ यांच्या घरी शिवसेनेची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सुषमा कलाने आल्या नसल्याने विचारपूस केली तेव्हा भन्साली यांच्या रुग्णालयात दाखल असल्याचे कळले. दरम्यान, काही काँग्रेसचे कार्यकर्ते भन्सालींच्या रुग्णालयात गेले व त्यांनी जबरदस्तीने सुषमा कलानी यांचा डिस्चार्ज घ्यायला लावून त्यांच्या आईवडिलांसह अज्ञातस्थळी नेले. ही बातमी दर्यापूरचे शिवसेनेचे नेते बाळासाहेब हिंगणीकर यांना कळली व ते जिल्हा परिषद सदस्य सुधीर सूर्यवंशी आणि अन्य शिवसैनिकासह भन्साली यांच्या रुग्णालयात पोहोचले. तेव्हा इसापूरचे रवी ठाकरे यांच्याकडे कलाने कुटुंबाला नेण्यात आल्याचे कळले.
  त्यानंतर या सर्वांनी आमदार अभिजित अडसूळ यांना याची माहिती दिल्यानंतर अडसूळही परतवाड्यात पोहचले व सर्वांनी मिळून सुषमा कलानी यांच्या अपहरणाची तक्रार परतवाडा पोलिस ठाण्यात केली. कलाने परिवाराच्या जिविताला धोका असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले असून त्यांच्या जिवाचे कमी जास्त झाल्यास काँग्रेसचे नेते व कार्यकर्तेच जबाबदार राहतील, असेही म्हटले आहे.