लादेनची पाकिस्तानात होती पाच घरे; पत्नीचा खुलासा

इस्लामाबाद, दि. ३० – अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा-बिन-लादेन याची पाकिस्तानात पाच घरे होती असा खळबळजनक खुलासा त्याच्या पत्नीने केला आहे. लादेन गेल्या ९ वर्षांपासून पाकिस्तानात एखाद्या सामान्य नागरिकाप्रमाणे निवास करीत होता. तसेच त्याच्या दोन मुलांचा जन्म येथील सरकारी रुग्णालयात झाला आहे, असे त्याची पत्नी अमल अहमद अब्दूल फतेह हिने चौकशी दरम्यान सांगितले.
  लादेनची सर्वात तरुण पत्नी अमल हिचे २००० साली लादेनशी लग्न झाले होते. त्यानंतर ती कराचीला आली व एका महिन्यानंतर अफगाणिस्तानात लादेन व त्याच्या इतर दोन पत्नींसोबत राहण्यास गेली होती. मात्र ११ सप्टेंबर २००१ साली अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी तो भूमीगत झाला होता. त्यानंतर २००३ साली तो पुन्हा आपल्या कुटुंबासोबत राहत होता, असे तिने सांगितले. पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये अमेरिकन नौदलाच्या जवानांनी लादेनला ठार केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुलांना व पत्नीला चौकशीकरिता अटक केली होती.