नंदुरबार, दि. ३० – औरंगाबाद येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांचे काही साथीदार नंदुरबार परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यामुळे दहशतवाद विरोधी पथकाने एका घरावर छापा टाकून काही संशयास्पद वस्तू हस्तगत गेल्या. औरंगाबाद येथे २६ मार्च रोजी दहशतवाद्यांना पकडताना चकमक उडाली होती. त्यात एक दहशतवादी ठार झाला तर दोघांना पकडण्यात या पथकाला यश आले होते.
मोहंमद अब्रार आणि मोहंमद खलील अशी या संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत. अहमदाबादमध्ये २००८ मध्ये झालेल्या स्फोटाशी अब्रारचा संबंध असल्याचा आरोप आहे तर मोहम्मद खलीलवर मध्य प्रदेशात अनेक गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जाते. एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्याचे वडील अखिल खिलजीला पोलिसांनी अटक केल्यानंतर या गटातील काही संशयित नंदुरबारमध्ये साड्या व चादर विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खिलजीने मेहतर वस्तीत भाड्याने खोली घेतली होती.
बुधवारी पथकाने या खोलीची तपासणी करुन एक मोबाईल, दोन कार्ड तसेच अन्य काही आक्षेपार्ह वस्तू हस्तगत केल्या. एटीएसचे अधिकारी मधुकर कडलग यांनी या कारवाईची माहिती दिली. खिलजीने दिलेल्या माहितीवरुन या घरावर एटीएसने नजर ठेवली होती, असे कडलग यांनी सांगितले.
