तीन महिन्यात स्वाईन फ्ल्यूमुळे २१ जणांचा बळी

नवी दिल्ली, दि. ३० – दोन वर्षांपूर्वी देशाच्या बहुतांश भागात थैमान घालणार्‍या स्वाईन फ्ल्यू रोगाच्या एच१-एन१ विषाणूंचा दिल्ली, महाराष्ट्रासह उत्तर आणि मध्य भारतातील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा फैलाव झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या तीन महिन्यात या भयानक रोगाने देशभरातील २१ रूग्णांचा बळी घेतला आहे. यात महाराष्ट्रातील सर्वाधिक नऊ रूग्णांचाही समावेश आहे.
  उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या देशातील विविध राज्यांत स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या ३०९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही कंबर कसली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये देखील स्वाईन फ्ल्यूचे रूग्ण सापडले असले तरी सुदैवाने कर्नाटक व गुजरात राज्यांतील एकही रूग्ण दगावलेला नाही. तर महाराष्ट्रात ९, राजस्थानात ७ आणि आंध्र प्रदेशमध्ये ५ जण दगावल्याची नोंद आहे. 
  हवामानामध्ये झालेल्या विचित्र बदलांमुळेच एच १- एन १ या विषाणूंचा फैलाव अधिक प्रमाणात झाल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव पी. के. प्रधान यांनी सांगितले. ऋतूंच्या बदलामुळे एच१एन१ विषाणुंची लागण झाली आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.     
  दरम्यान, १ ते २७ मार्चपर्यंत एकटया महाराष्ट्रात स्वाईन फ्ल्यूचे १७२ रूग्ण आढळले. तर राजस्थान ३९, आंध्रप्रदेश ३६, कर्नाटक ११ आणि गुजरातमध्ये १ रूग्ण आढळला. महाराष्ट्रातील पुण्यात स्वाईन फ्ल्यूचे सर्वात जास्त रूग्ण आढळले