शेगाव येथे श्रीराम जन्मोत्सव सुरु

बुलढाणा, दि.२७ – प्रभू श्रीराम हे संत गजानन महाराजांचे आराध्य दैवत आहे. श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने श्री रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने २३ मार्च गुढीपाडव्यापासून श्री गजानन महाराज संस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 श्रीराम नवमीनिमित्त निघणार्‍या भव्य पालखी सोहळ्यात हजारो भजनी दिड्यांचे सहभागी होतात. एप्रिलच्या १ तारखेला होणाऱ्या या सोहळ्यासाठी संस्थानच्या वतीने आनंद विहार व आनंद सागर विसावा परिसरात वारकर्‍यांसाठी भव्य व्यवस्था करण्यात आली आहे. श्रीराम नवमी उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा व्हावा यासाठी श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी विश्वस्त नीळकंठदादा पाटील व ५००० सेवाधारी मंडळी सेवा देत आहेत.
  गजानन महाराज संस्थानमध्ये सुरु असलेल्या अध्यात्मिक व समाजप्रबोधन कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.