सराफदुकाने बंद असूनही सोन्याची मोठी खरेदी

पुणे दि.२४(प्रतिनिधी)- शहरातील सराफ व्यापार्‍यांनी गुरुवारपासून पुन्हा बंद पुकारला असला तरी पाडव्याच्या दिवशी पुणेकरांनी सोन्याच्या चढ्या किमतींची अजिबात तमा न बाळगता सोनेखरेदी केल्याचे सराफ व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.केंद्राने सोन्यावरील सीमा, अबकारी करात वाढ केल्याच्या निषेधार्थ पुण्यातील सराफ व्यावसायिकही राज्य सराफ व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंदमध्ये सामील झाल्याने दि.१७ पासून सराफी दुकाने बंदच होती. मात्र पाडव्याच्या आदल्या दिवशीपासून दुकाने पुन्हा उघडली तरी त्यादिवशी अमावस्या असल्याने ग्राहक दुकानांकडे फारसे फिरकले नव्हते असे पी.एन.जी म्हणजे पु.ना गाडगीळ सराफ पेढीकडून सांगण्यात आले.
गुढी पाडवा हा साडेतीन मुर्हूर्तांपैकी एक असलेला व नववर्षाचा पहिला दिवस सोनेखरेदीसाठी शुभ मानला जातो. या दिवशी अर्धा ग्रॅम का होईना पण सोने खरेदी करणार्‍याचंी संख्या मोठी असते. लग्नकार्यासाठी करावयाच्या दागिन्यांसाठीही या दिवशी खरेदी करून मुर्हूत केला जातो. यंदाही पुणेकरांनी सकाळपासूनच सराफी दुकानांतून सोने खरेदीसाठी अक्षरशः रंागा लावल्या होत्या. मात्र यंदा दागिन्यांपेक्षा सोने वेढण्यांना अधिक मागणी होती. कांही दुकानांनी वेढणी खरेदीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही केली होती. काल सोन्याचा दर १० ग्रॅमला २८ हजार २०० रूपये इतका होता.चांदीचा दर तुलनेने कमी म्हणजे किलोला ५७ हजार रूपयांवर असूनही चांदीला मात्र म्हणावी तेवढी मागणी नव्हती असेही सराफ गाडगीळ पेढीकडून सांगण्यात आले. सेवाकराच्या निषेधार्थ आजपासून पुन्हा सराफी दुकानांनी बंद पुकारला आहे.