अणु सुरक्षेला भारताचे प्राधान्य – पंतप्रधान

नवी दिल्ली, दि. २४- दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे होणार्‍या अणु सुरक्षा परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह शनिवारी रवाना झाले. भारताचे प्राधान्य अणु सुरक्षेलाच आहे, असे पंतप्रधान सोल येथे रवाना होण्यापूर्वी म्हणाले. अणु दहशतवाद आणि सुरक्षा याबाबतची भारताची भूमिका पंतप्रधान मांडणार आहेत. 
  देशातील उर्जेची वाढती गरज लक्षात घेऊन भारतात अणु उर्जा प्रकल्पांच्या विस्तार होत आहे. मात्र अणु सुरक्षेला प्राध्यान्य देण्यात आले आहे. याबद्दल जनतेचा पाठिंबा मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागरण करण्याची गरज आहे. जपानमधील फुकुशिमा प्रकरणानंतर सुरक्षेचा मुद्दा अधिक महत्वाचा झाला आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. भारतातील कुडानकुलमप्रमाणे सोल येथेही अणु प्रकल्पाला जनतेचा विरोध आहे. तसेच अणु उर्जेला विरोध करण्यासाठी द. कोरिया, जपान, तैवान आणि थायलंडमधील अनेक आंदोलनकर्ते परिषदेच्या ठिकाणी जमले आहे.
 या परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांची भेट घेणार आहेत. मात्र ओबामा व मनमोहनसिंग यांच्या भेटीबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अणु उर्जा व अणु सुरक्षेबद्दल चर्चा करण्यासाठी सुमारे २०० उद्योगपती व अणु उर्जा विशेषज्ञांच्या गेल्या तीन दिवसांपासून बैठका होत आहेत.