….त्यांनी कार्यालयातच काढले कपडे वीस मिनीटांत काम झाले दोन महिने रखडलेले

पुणे, दि. २२- वारंवार खेटे मारूनही काम होत नाही म्हणून थेट मुन्नाला ‘कॉल’ करून कार्यालयात कपडे काढलेला ‘मुन्नाभाई एमबीबीएस मधला’ वृद्ध नागरिक आठवतोय….? पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात दि. २१ ला दुपारी अगदी तशीच घटना घडली. वैतागलेल्या एका सदगृहस्थाने एकामागून  कपडे काढायला सुरुवात केली; आणि दोन महिन्यांपासून रखडलेले काम फक्त वीस मिनीटांत झाले.
  गाडीसाठी क्रमांक तसेच ड्रायविंग लायसन्स मिळविण्यासाठी परिवहन कार्यालयात सगळ्यांनाच अनेक खेटे मारावे लागतात हा नेहमीचाच अनुभव आहे. या नेहमीच्या कारभाराला वैतागलेल्या एका व्यक्तीने बुधवारी दुपारच्या वेळी असा काही इंगा दाखवला की काम करण्याशिवाय कर्मचाऱ्यांना पर्यायच उरला नाही. मुलाचे लायसन्स मिळावे यासाठी गेल्या दोन महिन्यापासून  ते चकरा मारत होते. तरीही त्यांचे काम होत नव्हते. डोक्यावरचे उन्ह मी म्हणत आहे. रोज तापमानात वाढ होत आहे. अशा वाढत्या उन्हात रोजच्या रोज चकरा मारून थकलेल्या त्या गृहस्थाचा पारा आज आणखीनच चढला होता; मात्र मनावर पूर्ण ताबा ठेवत ‘एक्साईट’ न होता त्यांनी शांतपणाने अधिकार्‍यांच्या समोर कपडे काढायला सुरुवात केली; आणि सारे कार्यालय अवाक होऊन त्यांच्याकडे पहात राहिले.
त्यांच्या मुलाचे लायसन्स काढायचे होते. केवळ लायसन्स नसल्याने त्यांच्या तरुण मुलाची मिळणारी नोकरी गेली आहे. जलसंपदा विभागात चालकाच्या जागा भरायच्या होत्या. सनी वाघमारे नाव असलेल्या या तरुणाने अर्जही केला; मात्र त्याच्याकडे लायसन्स नसल्याने ती संधी गेली. ही अडचण किमान पुढील वेळी तरी येऊ नये यासाठी दोघेही पितापुत्र परिवहन कार्यालयात चकरा मारत होते. आवश्यक ती सर्व कागदपत्र जोडली. लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षाही दिल्या, तरी त्यांना पुनःपुन्हा ‘उद्या या’ हा नेहमीचा शासकीय शब्द ऐकायला मिळत होता. मध्येच लायसन्स  पोस्टाने पाठविले आहे असेही सांगण्यात येत होते. त्यांनी पोस्टाच्या पायर्‍याही झिजवल्या मात्र जे आडातच नव्हते ते पोहर्‍यात कोठून येणार? लायसन्स पाठवलेच नव्हते हे सिद्ध झाल्यानंतर ते आज अखेरचे काहीतरी करून दाखवण्यासाठी कार्यालयात आले होते.
पोस्टापासून कार्यालयापर्यंत मारलेल्या सर्व चकरा त्यांनी परिवहन अधिकार्‍यांना सांगितल्या; मात्र त्याला कोणीही दाद द्यायला तयार नव्हते. दुपारच्या वेळी ते लायसन्स दिल्या जाणार्‍या विभागात गेले. तेथेही त्यांना तोच अनुभव आला. संयम सुटत चाललेल्या वाघमारे यांनी आरडाओरडा करत तेथेच स्वःतच्या अंगावरील कपडे एकामागून एक उतरविण्यास सुरुवात केली. प्रत्येक कपड्यांनिशी परिवहन कार्यालयाच्या कारभारची अब्रु वेशीला टांगली जाऊ लागली. कार्यालयात गर्दी वाढू लागली. काहीजणांनी ‘तुझे काम लगेच होईल, तु कपडे काढू नको, असे सांगायचा प्रयत्न केला. एक अधिकारी समजवत त्यांच्या जवळ गेले आणि व्हायचे ते झाले. संतापलेल्या वाघमारे यांनी त्या वरिष्ठ अधिकार्‍याच्या श्रीमुखात भडकावली. गोंधळ आणि गर्दीतच आधीच ब्रेअब्रू झालेल्या त्या अधिकार्‍याच्या मुस्कटात पडल्यावर कार्यालयातील सूत्रे अखेर वेगाने फिरली आणि अवघ्या वीस मिनीटांत वाघमरे यांच्या मुलाला लायसन्स मिळाले.