दगडूशेट गणपती मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ता संगीत महोत्सव

पुणे,दि.२१-श्रीमंत दगडूशेट गणपती मंदिराच्या २९व्या वर्धापन दिनानिमित्ता संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुडीपाडवा आणि रामनवमी (२३ मार्च ते१ एप्रिल) दरम्यान आयोजीत या महोत्सवात पंडित बिरजू महाराज, पं.शिवकुमार शर्मा, पं.रेणू मुजूमदार, पं.हृदयनाथ मंगेशकर आदी मान्यवर कलाकार वर्णी लावणार आहेत.
    रमणबाग प्रशाला मैदानावर होणार्‍या या महोत्सवाचे २३ मार्च रोजी  आमदार गिरीष बापट यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी कवी मंगेश पाडगावकर असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर वैशाली बनकर उपस्थित राहणार आहेत.  यावेळी पाडगावकरांच्या कवितांवर आधारीत ‘माझे जीवन गाणे’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.
    २४ मार्च रोजी गायक श्रीधर फडके यांचा ‘फिटे अंधाराचे जाळे’ हा कार्यक्रम तर २५ मार्च रोजी आशा खाडिलकर यांचा ‘स्वरांजली’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. २६ मार्च रोजी पं.बिरजू महाराज हे आपली नृत्य कला सादर करणार आहेत. २७ मार्च रोजी पं.रेणू मुजूमदार, पं.दुर्गा प्रसाद आणि पं.अश्विनकुमार आझाद आदींची जुगलबंदी हे महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे. तसेच २७ मार्च रोजी पं.शिवकुमार शर्मा आणि पं.विजय घाटे यांची तबला आणि संतूर मधील जुगलबंदी रंगणार आहे. २८,२९ ला पं.जसराज, शौनक अभिषेकी यांची मैफल होणार असून ३० मार्च रोजी उषा मंगेशकर यांच्या लावणी गायनाचा कार्यक्रम होणार आहे. १ एप्रिल रोजी पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर फडतरे यांच्या हस्ते गुडी उभारून  या महोत्सवाची सांगता होणार आहे. यावेळी उपमहापौर दीपक मानकर, पं.हृदयनाथ मंगेशकर, वसंत थोरात आदी उपस्थित राहणार असल्याचे ट्रस्टच्यावतीने सांगण्यात आले आहे. महोत्सवाचे सर्व कार्यक्रम सकाळी ७ ते १० या वेळेत होणार असून सर्वासाठी खुले  आहेत.