
उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी यांच्या अरभाट निर्मिती कृत आणि प्रवीण मसालेवाले प्रस्तुत व संदेश कुलकर्णी दिग्दर्शित मसाला या चित्रपटाचे झणझणीत म्युझिक लॉन्च नुकतंच करण्यात आलं. यावेळी मसालाचे संगीतकार आनंद मोडक, अजय गोगावले, अवधूत गुप्ते व बेला शेंडे तसेच मसाल्याचे क्रिएटीव्ह प्रोड्युसर उमेश कुलकर्णी, कथालेखक व अभिनेते गिरीश कुलकर्णी, अभिनेत्री अमृता सुभाष आणि प्रवीण मसाले चे संचालक विशाल चोरडिया आदी उपस्थित होते.
आनंद मोडक यांनी या चित्रपटाच्या संगीतासाठी नव्या जुन्याचा उचित मेळ घातला असून मसाल्याचं संगीत सुंदर केलं आहे. तरुण पिढीचे आवडते गायक अजय गोगावले, अवधूत गुप्ते आणि बेला शेंडे यांना एकत्र आणलं आहे. शिवाय अजय गोगावले आणि अवधूत गुप्ते हे दोघेही संगीतकार असल्यामुळे तीन संगीतकार एकत्र येऊन हे संगीत तयार झालं आहे. तर मसाल्याची गाणी प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक सुनील सुखकथनकर यांनी लिहिली आहे.
मसाला चित्रपटातील प्रमुख भूमिकेत गिरीश कुलकर्णी व अमृता सुभाष असून ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांची अत्तरवाल्याची भूमिका ही चित्रपट रसिकांसाठी विशेष आकर्षण आहे. याशिवाय या चित्रपटात डॉ.मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, ज्योती सुभाष, श्रीकांत यादव, ऋषीकेश जोशी, शशांक शेंडे, प्रवीण तरडे, नेहा शितोळे, गार्गी , स्नेहा माझगांवकर, सुहास जोशी, प्रशांत पेठे, नंदकिशोर चौघुले, प्रशांत तपस्वी, ओम भुतकर, मंदार परळीकर, ओवी कुलकर्णी, दीपक दामले आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
