गिलानी राजीनामा देण्यास तयार

लाहौर, दि. १९- राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची प्रकरणे सुरु करण्यासाठी स्विस प्रशासनाला विनंती करण्याचे प्रकरण सुटत असेल तर आपली राजीनामा देण्याची तयारी असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी सोमवारी सांगितले. माझ्या राजीनामा दिल्याने हे प्रकरण मिटणार असेल तर मी आनंदी होईन, असे गिलानी लाहोर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
झरदारी यांच्या विरोधात खटला भरणे व न्यायालयाची अवहेलना केल्याबद्दल शिक्षा भोगण्यासाठी पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने गिलानींना दिलेल्या अल्टीमेटमबद्दल ते म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करुन मी राजीनामा देण्यास तयार आहे. पण माझ्यानंतर जी व्यक्ती या पदावर येईल त्यालाही याच समस्यांना तोंड द्यावे लागेल.
झरदारी पाकिस्तानचे राष्ट्रपती असून त्यांना घटनेने विशेषाधिकार दिले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर खटला भरण्यासाठी स्विस प्रशासनाला आपण पत्र लिहणार नसल्याचे गिलानी यांनी आधीच स्पष्ट केले आहे. झरदारी विरोधात खटला भरण्यासाठी पत्र लिहून घटनेचे उल्लंघन करण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी आपण तुरुंगात जाणे पसंत करु, असे त्यांनी येथे सांगितले.
  झरदारींच्या खटल्याप्रकरणी स्विस प्रशासनाला पत्र लिहण्यासाठी न्यायालयाने त्यांना २१ मार्च पर्यंत वेळ दिली आहे. त्यानंतर पुन्हा सदर प्रकरणावर सुनावणी सुरु होईल. त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यास त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.