इंडोनेशियात पोलिसांकडून पाच संशयित दहशतवादी ठार

बाली, दि. १९ – इंडोनेशियाच्या दहशतवाद विरोधी पथकाने सुप्रसिध्द पर्यटनस्थळ असलेल्या बाली येथे पाच संशयित दहशतवाद्यांना ठार केले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली. इंडोनेशियातील दहशतवाद वाढविण्याच्या दृष्टीकोनातून  आर्थिक मदत करण्यासाठी काही दहशतवाद्यांनी बाली येथे दरोडा घालण्याची योजना तयार केली होती. ही माहिती  मिळताच आम्ही त्यावर कारवाई केली, असे राष्ट्रीय पोलिस प्रवक्ते बॉय रफील यांनी सांगितले.
  पोलिसांना त्यांच्या ठिकाणांची माहिती मिळाल्यावर कारवाईस सुरुवात करण्यात आली. त्यांना शरण येण्यास सांगितले असता त्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरु केला. पोलिसांनी त्यांना दिलेल्या प्रत्युत्तरात पाच जण ठार झाले, असे ते म्हणाले. विदेशी चलन विनिमय केंद्रे, दागिन्यांची दुकाने, कुटा व जिबारन येथील कॅफे आणि बाली येथील दोन लोकप्रिय बीचेसवर दरोडा घालण्याची योजना यांनी तयार केली होती. त्यांना दहशतवाद पसरविण्यासाठी पैशांची गरज होती, असे त्यांनी यावेळी सांगितले.
  इंडोनेशिया हा मोठा मुस्लीम देश असून गेल्या दशकात येथे बरेच दहशतवादी हल्ले झाले आहेत. २००२ साली बालीच्या एका नाइट कल्बमध्ये झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात अनेक विदेशी नागरिकांसह २०२ लोक ठार झाले होते. २००५ साली एका बीचवर झालेल्या हल्ल्यात २६ लोक मरण पावले होते. तर १०० जण गंभीर जखमी झाले होते.