वाढत्या वयानुसार शरद पवारांचा हिंदू धर्मावरचा रागदेखील वाढत आहे


मुंबई – देशासह राज्यावर ओढावलेल्या कोरोनासारख्या संकट काळात मला राज्याच्या हिताचीही जबाबदारी मोठी वाटत आहे. सध्या राम मंदिराबाबत कोणताही वाद नाही. हा वाद सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मिटला आहे. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रण मिळाले तरी जाणार नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. वाढत्या वयानुसार शरद पवार यांचा हिंदू धर्मावरचा रागदेखील वाढत असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

“बातमीची हेडिंग वाचली तेव्हा वाटलं एमआयएम पक्षाचे ओवेसी बोलत आहेत. नंतर शरद पवार यांचं नाव दिसलं. एवढं मात्र खरं शरद पवार यांचं वय बघून कोणी काही बोलत नाही. पण जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर शरद पवार यांचा रागही वाढताना दिसत आहे,” अशी टीका निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. हे भूमिपूजन ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निमंत्रण दिले तरी आपण राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जाणार नसल्याचे न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.