पुणे दि.१६- स्वाईन फ्ल्यूने काल पुण्यात आपला दुसरा बळी नोंदविला असताना आणि स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली असतानाही स्वाईन फ्ल्यूच्या लसीला मात्र अद्यापीही मागणी नसल्याचे समजते.
येथील सिरम इन्स्टिट्यूटने स्वाईन फ्ल्यूला प्रतिबंध करणारी नाकावाटे घेण्याची पहिली स्वदेशी लस तयार केली होती. गेल्या सहा महिन्यात मात्र या लसीचा एकही डोस विकला गेलेला नाही. त्याचबरोबर संस्थेने तयार केलेल्या तिपदरी लसीच्या क्लिनिकल चाचण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्याकडून परवानगीची प्रतीक्षा आहे. या फेज टूच्या लसीमध्ये स्वाईन फ्ल्यूपासूनही संरक्षण मिळू शकणार आहे असे संस्थेचे वरीष्ठ संचालक डॉ.राजीव ढेरे यांनी सांगितले.
डॉ.ढेरे म्हणाले की नागरिक स्वाईन फ्ल्यूवरची लस घेत नाहीत असे आम्हाला आढळले आहे. परिणामी गतवेळच्या साथीच्यावेळी तयार करण्यात आलेले लसीचे लाखो डोस मुदत संपल्याने नष्ट करावे लागले आहेत. आत्ताही कांही शिल्लक असलेल्या डोसांची एक्स्पायरी या महिनाअखेर आहे. शासनाने मागणी न केल्यास हे डोसही नष्ट करावे लागतील. वास्तविक साथ आल्यावरच लसीकरण करण्याऐवजी स्वाईन फ्ल्यूसाठी अगोदरच लसीकरण मोहिम राबविणे आवश्यक आहे मात्र शासनानेच हा कार्यक्रम हाती घेऊन अन्य लसीकरण कार्यक्रमांप्रमाणेच राबविणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेतील डॉक्टर प्रसाद कुलकर्णी म्हणाले की आम्ही लस कोणत्याही क्षणी तयार करण्याची तयारी ठेवली आहे मात्र मोठी मागणी असल्याशिवाय हे उत्पादन केले जाणार नाही. इंजेक्शनस्वरूपात देण्यात येणार्या लसीचे पन्नास हजार डोसांनाही मागणी नाही असे सांगून ते म्हणाले की सध्या संस्थेत तीन रोगांवर उपयुक्त ठरू शकेल अशी लस तयार करण्यात आली आहे आणि त्याच्या दुसर्या फेजच्या क्लिनिकल चाचण्यांसाठी ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया कडून परवानगी मिळण्याची प्रतीक्षा आहे. ही नवी लस एचवन एनवन विषाणू, एच थ्री एन टू विषाणू तसेच इन्फ्यूएन्झा बी विषाणूसाठी उपयुक्त असून ती नाकावाटे घेता येणार आहे.
दरम्यान काल पुण्यात स्वाईन फ्यूची लागण झालेले रिक्षाचालक श्रीकांत शिंदे यांचा मृत्यू झाला.६ मार्चपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
