सहा जिल्ह्यात अफू पीक सापडल्याने चिंता व्यक्त

पुणे दि.१६- राज्यात गेल्या तीन आठवड्यात सहा जिल्ह्यातून अवैध अफू लागवड उघडकीस आल्यानंतर या अफूसाठी नांदेड येथे विश्रांतीसाठी थांबणारे ट्रकचालक हे मुख्य ग्राहक असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. प्रवासाने आलेला शीण आणि फटिग घालविण्यासाठी हे चालक अफू सेवन करतात आणि मग त्याचेच व्यसन त्यांना लागते असे बीडचे पोलिस निरीक्षक सुदर्शन मुंडे यांनी केलेल्या तपासात स्पष्ट झाले आहे. मुंडे हे अफू लागवड, त्याची प्रक्रिया केंद्रे आणि ग्राहक अशा दुव्यांचा तपास करत आहेत.
     गेल्या तीन आठवड्यात बीड येथील पोलिसांनी बीडमध्ये ४४  टन अफू नष्ट केली असून राज्यातील पोलिसांनी सांगली, सातारा, पुणे, उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्ह्यात अफू लागवड शोधून काढली आहे. मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार बीड येथील अफू अधिक तीव्र असल्याने त्याला राज्यभरातून मोठी मागणी आहे. बीड येथील चार व्यापार्‍यांना पोलिसांनी अटकही केली असून त्यातील नारायण इरबटनावर हा लातूरचा व्यापारी बीड येथील अफू आणून त्यावर शिरूर ताजबंड येथे प्रक्रिया करतो व नांदेड येथे या बीडच्या परळी ब्रँड नावाने तयार होणार्‍या अमली पदार्थांचा पुरवठा केला जातो असेही स्पष्ट झाले आहे.
   नांदेड हे या अफूपासून बनलेल्या पदार्थ विक्रीचे मुख्य केंद्र आहे.  येथील शीख समाज अफू औषधासाठी वापरतो मात्र हे प्रमाण अल्प असून मुख्यत्वे ट्रकचालकांनाच ही अफू विकली जाते असेही स्पष्ट झाले आहे.