स्त्रीने आईचे काळीज जपणे आवश्यक- सिंधूताई सपकाळ

सोलापूर, दि. ९ – पोलीसांमध्ये आईचे काळीज आहे म्हणूनच देशाचा कारभार योग्य पध्दतीने सुरू आहे. स्त्रीयांनी आईचे काळीज जपणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी केले. सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पोलीस मुख्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महापौर अलका राठोड, पोलीस आयुक्त हिम्मतराव देशभ्रतार, पोलीस उपायुक्त राजेंद्र माने, स्मार्तना पाटील, पी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय जोशी, खुशालचंद बाहेती यांच्यासह महिला पदाधिकारीं उपस्थित होत्या.
  स्त्री ही क्षणाची पत्नी तर अनंत काळाची माता आहे. बापाची गरिबी झाकण्यासाठी मुलगी आणि देशाची वेदना झाकण्यासाठी स्त्रीच आहे. जगात स्त्रियांच अधिक शोषीत आहेत. स्त्रियांनी वेदना सहन केल्या पाहिजे कारण त्याचे रुपांतर वेदामध्ये होते, असेही सिंधूताई सपकाळ यांनी सांगितले.

  पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी स्त्रियांच्या जन्माची उध्दारक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. पोलीस आयुक्त हिम्मतराव देशभ्रतार यांनी अनेक जुन्या रिती रिवाज आजही चालू आहेत. त्यातून स्त्रियांवर अन्याय अत्याचार कुठे ना कुठे होत आहे. त्यामुळेच महिलांनी सक्षम होणे आवश्यक आहे असे सांगितले. त्यानंतर महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस आयुक्तालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धांमधील विजेत्या महिलांना सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला पोलीस शिपाई अश्विनी गोटे यांनी केले.