विठ्ठल मूर्तीला लेप देण्याचा मार्ग मोकळा पुरातत्व विभाग व वारकर्‍यांची सकारात्मक चर्चा

 पंढरपूर, दि. ९ – श्रीविठ्ठल मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी समितीने घेतलेल्या लेप देण्याच्या निर्णयावर आज केंद्रीय पुरातत्व विभाग व वारकरी प्रतिनिधींची चर्चा झाली. मूळ मूर्तीत कोणताही बदल होणार नसल्याची ग्वाही पुरातत्व विभागाकडून मिळाली व सर्व प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाल्याने श्री विठ्ठल मूर्तीला लेप देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
श्रीविठ्ठल मूर्तीवर करण्यात येणार्‍या प्रक्रियेला वारकरी संघटनानी विरोध दर्शविला होता. याची दखल घेऊन मंदिर समितीने गेल्या महिन्यात २९ फेब्रुवारी रोजी समितीच्या झालेल्या बैठकीत श्रीविठ्ठल मूर्ती संवर्धनासंदर्भात मूर्तीतज्ञ देगलुरकर, पुरातत्व विभागाचे एम.सिंग आणि वारकरी प्रतिनिधींशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज औंरगाबाद येथील पुरातत्व विभागाचे अधिक्षक एम.सिंग  यांनी पंढरपूरात येऊन वारकरी फडकरी दिडी संघटनाच्या प्रतिनिधीशी श्रीविठ्ठल मंदिरात चर्चा केली.
यापूर्वी २००५ साली श्री विठ्ठल मूर्तीवर सिलीकॉन लेप देण्यात आला होता. श्री विठ्ठल मूर्तीवर वॅकर बीएस २९० ही रासायनिक प्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे मूळ मूर्तीला कोणताही धोका पोहचणार नाही व मूळ स्वरूपही आहे तसेच राहणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे एम. सिंग  यांनी दिली. वारकरी प्रतिनिधीनी  आपल्या मनातील शंका मूर्तीतज्ञांना विचारल्या त्यांनी वारकर्‍यांच्या सर्व प्रश्नांचे निरसन केले. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे वारकरी फडकरी दिंडी संघटनेचे प्रतिनिधी ह.भ.प.जळगावकर महाराज यांनी सांगितले. यामुळे श्री विठ्ठल मूर्तीवर लेप देण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच आता विठ्ठल मूर्तीवर लेप देण्यात येणार आहे.
—————

Leave a Comment