पुण्यात सोनेचांदीवरील जकातीतून विक्रमी महसूल

पुणे दि.२८- यंदाच्या आर्थिक वर्षात पुणे महानगरपालिकेने सोनेचांदीवरील जकातीतून विक्रमी महसूल गोळा केला असून मार्च अखेर ही रक्कम २० कोटी रूपयांवर जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सराफी व्यावसायिक करत असलेल्या जकातचोरीसंदर्भात कडक उपाययोजना आणि योग्य ती दक्षता घेतल्यामुळेच हे शक्य झाले असल्याचे जकात विभाग प्रमुख हेमंत निकम यांनी सांगितले.
  निकम या विषयी अधिक माहिती देताना म्हणाले की गेल्या ११ महिन्यात सोने चांदीवर तब्बल १८ कोटी रूपये जकात वसुल करण्यात आली असून गेल्या आठ वर्षात म्हणजे २००३ ते ११ या काळात वसुल केली गेलेली जकात केवळ १३ .८ कोटी रूपये आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील अजून दोन महिने बाकी आहेत व या काळात जकातीची रक्कम वीस कोटींवर जाईल असा आमचा अंदाज आहे. ही जकातवसुली विक्रमी आहे.
    पुण्यात अनेक सराफ सोने चांदीवरील जकातचोरी करत असल्याचे लक्षात आल्यानंतर जकात विभागाच्या कर्मचार्‍यांनी राज्य विक्रीकर विभागाशी संफ साधून या संदर्भात त्यांच्याकडे सहकार्य करण्याची विनंती केली व विक्रीकर विभागानेही त्यासाठी सहकार्य केले असल्याचे सांगून निकम म्हणाले की जकातचोरी करणारे हे सराफ सोने चांदी विक्रीवर मोठा विक्रीकर भरत होते मात्र सोने चांदी खरेदीची किमत कमी दाखवून जकात चुकवित होते. हे लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्या भरारी पथकांची संख्या २५ वरून ३५ वर नेलीच पण जकातचोरी करणार्‍या १२१ सोनेचांदी व्यापार्‍यांना जकात चोरीसंदर्भात नोटीसाही जारी केल्या.त्याचा चांगला परिणाम दिसून आला व त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर जकात वसुली होऊ शकली.