शाळा ही प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य भाग… शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या की मन तजेलदार होतं…शाळा म्हटली की पहिल्यांदा आठवते ती शाळेची घंटा… शाळा भरणारी – मधल्या सुटीतली आणि शाळा सुटणारी. पण या सगळ्यात प्रत्येकाच्या आवडीची वेळ असते ती मधल्या सुटीतील… मधल्या सुट्टीत केलेली धमाल म्हणजे व्वा क्या बात है! याच मधल्या सुट्टीत घडणा-या गंमती जमंती आपल्या भेटीला घेऊन येत आहे गायक-संगीतकार सलील कुलकर्णी. झी मराठी वाहिनीवर आपल्याला घेऊन जाणार आहे शाळेच्या मधल्या सुट्टीत.
वयाने कितीही मोठं झाल्यानंतरही आपल्या मनात बालपणीच्या आठवणी कायम रुंजी घालत असतात. याच आठवणींचा शोध घेण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं सलीलने सांगितले. सासु-सुनांचा तोच तो इमोशनल मेलोड्रामा, स्पर्धा या सगळ्यांपासून चार हात लांब असणारा असा हा कार्यक्रम असल्याचे सलीलने म्हटले आहे.
दर आठवड्याला वेगवेगळ्या शहरातल्या शाळेत जाऊन सलील शाळकरी मुलांबरोबर ‘मधली सुट्टी’ घालवणार आहे. शिवाय या मुलांबरोबर सलील खास गाणं तयार करुन ते त्यांच्यासह सादर करणार आहे. लहानांपासून ते थेट वयोवृद्धांना आपल्या शाळेची आठवण करुन देणारा हा कार्यक्रम असल्याचे सलीलने सांगितले. शुटींगच्या दरम्यान ‘मधली सुट्टी’ मिळाली का, असे त्याला छेडले असता तो म्हणाला, महा कार्यक्रम म्हणजेच रोजच्या धकाधकीच्या जीवनात मिळालेली ‘मधली सुट्टी’ आहे.