सत्ता, सत्तेची लालसा आणि येनकेन प्रकारेण सत्तेला चिटकून राहून अपप्रकारांवर पांघरूण घालण्याची प्रवृत्ती माणसाचे किती अधःपतन करीत असते याचे आदर्श उदाहरण म्हणजे काँग्रेसचे नेते कपिल सिबल, अभिषेक मनु सिंघवी आणि राशीद अल्वी. हे लोक काँग्रेसच्या दुष्कृत्यावर, संपुआघाडीतच्या ढिसाळपणावर आणि सोनिया गांधी यांच्या सारे काही जाणून साळसूदपणाचा आव आणण्याच्या वृत्तीवर पांघरूण घालण्यासाठी जे तकलादू युक्तिवाद आणि मखलाशी करीत असतात ती पाहिली म्हणजे आश्चर्य वाटत. आश्चर्य त्यांच्या (कु) बुद्धीमत्तेचे वाटत नाही. आश्चर्य त्यांच्या वकिली कौशल्याचे वाटत नाही. आश्चर्य वाटते ते त्यांच्या भारतीय जनतेच्या आकलनाचे. भारतातले लोक मूर्ख आहेत, त्यांना काहीही सांगितले तरी पटते, तेव्हा समजून उमजून त्यांना खोटे सांगत रहा अशी त्यांची समजूत आहे. आपण जे बोलत आहोत ते कमालीचे खोटे, ओढून ताणून आणलेले आहे, त्यात सत्याचा अंशही नाही हे आपल्याला माहीत असले तरी जनतेच्या मनात गोंधळ माजवण्यासाठी आपण तेच ते बोलत राहिले पाहिजे असा या तिघांचा पण आहे. २ जी स्पेक्ट्रम प्रकरणात पी. चिदंबरम यांना सहआरोपी करण्याची मागणी करणारा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आणि त्यांना सहआरोपी करता येणार नाही असा निर्वाळा दिला. हा निकाल येताच हे वाचावीर एकदम जागे झाले आणि आता भारतीय जनता पार्टीने देशाची माफी मागावी अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या निकालाने चिदंबरम यांना दोषी ठरवले नाही म्हणजे चिदंबरम अगदीच काही मोकळे सुटलेले नाहीत. त्यांना कायमचा दिलासा मिळालेला नाही. आता कोठे सत्र न्यायालयाच्या स्तरावर त्यांना हा दिलासा मिळाला आहे. कपील सिबल, सिघवी आणि खुद्द चिदंबरम हे नावाजलेले वकील आहेत. सत्र न्यायालयाचा निकाल हा अंतिम निकाल नसतो, तिथे अर्ज फेटाळला गेला तरी उच्च न्यायालयाची दारे मोकळी असतात, तिथे दाद मागता येते, हे सारे या लोकांना माहीत आहे. एवढेच नव्हे तर चिदंबरम यांना या वरच्या न्यायालयात आरोपी ठरवले जाण्याची शक्यता जास्त आहे हेही या लोकांना माहीत आहे पण लगेच भाजपाने माफी मागावी अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनी भाजपावर बाजू उलटवण्याचा प्रयत्न केला. चिदंबरम यांना सहआरोपी करण्याचा अर्ज भाजपाने केला नव्हता, तो सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. मुळात एखादा खटला हरला म्हणून कोणाची माफी मागण्याचा काही प्रघात नाही पण सिबल प्रभृतींच्या शास्त्रात तसे काही असेलच तर माफी भाजपाने न मागता स्वामी यांनी मागायला पाहिजे. पण सिबल यांनी भाजपाकडून माफीची अपेक्षा व्यक्त करून वड्याचे तेल वांग्यावर घालण्याचा व्यर्थ प्रयत्न केला आहे. दोनच दिवसांपूर्वी संपुआघाडी सरकारने देशाची १.७६ लाख रुपयांची लूट केल्याचे सिद्ध झाले. ते काही सत्र न्यायालयात सिद्ध झालेले नाही तर सर्वोच्य न्यायालयात अंतिमतः सिद्ध झाले आहे. त्यावेळी काँग्रेसचा एखादा नेता (अगदी कमालीचा खोटारडा नेता सुद्धा) तासभर प्रतिक्रिया द्यायला उपलब्ध झाला नव्हता पण आता मात्र ताबडतोब प्रतिक्रियेस हजर. या सरकारने एवढा मोठा डाका घातल्याचे सिद्ध झाले पण मनमोहनसिंग किवा आघाडीच्या नेत्या सोनिया गांधी यांनी देशाची एका शब्दानेही माफी मागितली नाही की साधी दिलगिरीही व्यक्त केली नाही. खटला हरल्यास माफी मागावी लागत असेल तर चिदंबरम यांच्या संबंधातल्या या निर्णयापेक्षा १२२ अवैध परवान्यांच्या संबंधात माफी मागण्याची अधिक गरज आहे. अशी माफीच मागायची तर मनमोहनसिग यांना दर आठवड्याला एक माफी मागावी लागेल. देशातल्या भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्याच्या पदावर त्यांनी स्वतःच भ्रष्टाचाराच्या आरोपात गुंतलेल्या माणसाला नेमले. केवळ नेमलेच असे नाही तर तो भ्रष्टाचाराच्या आरोपात गुंतलेला असल्यामुळे त्याला नेमू नये असे वारंवार सांगितले जात असतानाही नेमले आणि त्याच्या नेमणुकीचे सतत समर्थन केले. सर्वोच्य न्यायालयात हा गुन्हा पुराव्यानिशी सिद्ध झाला. तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाची माफी मागणे सभ्यपणाचे आणि प्रांजळपणाचे ठरले असत. खरे तर एखादा माणूस अजाणतेपणाने अपराध करतो आणि त्याला त्याची जाणीव झाल्यावर क्षमा मागतो तेव्हा त्याला प्रांजळपणा म्हणतात पण मनमोहन सिग यांनी ती नेमणूक अजाणतेपणाने केलेली नव्हती तर त्या नेमणुकीचा गुन्हा समजून आणि उमजून केला होता. त्यामुळे त्यांनी देशाची माफी मागितली असती तरी तो प्रांजळपणा ठरला नसता. असो आता चिदंबरम मोकळे सुटले हा भाजपाचा पराभव आहे असे या गृहस्थाला वाटत आहे. पण तो भाजपाचाच पराभव नाही. तो काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचाही पराभव आहे कारण चिदंबरम हे २ जी प्रकरणातले सहआरोपी होऊ शकतात हे सर्वात आधी प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून कळवले होते. तेव्हा माफीची मागणी भाजपा बरोबरच प्रणव मुखर्जी यांच्या कडूनही केली पाहिजे मात्र आपल्यावर तशी वेळ येऊ नये म्हणून प्रणवदा अर्थ मंत्रालयातून आणखी काही कागदपत्रे लीक करतीलच.
