अण्णा हजारे झळकणार टाईम मासिकाच्या मुख्यपृष्ठावर

पुणे दि.२६- सामाजिक कार्यकर्ते व भ्रष्टाचार विरेाधी आंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे लवकरच प्रतिष्ठीत टाईम मासिकाच्या मुख्यपृष्ठावर झळकणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.राळेगण सिद्धीमधील अण्णांच्या सहकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी टाईम मासिकाच्या फेाटोग्राफर्सच्या टीमने अण्णांची भेट घेऊन अण्णा जेथे राहतात त्या यादवबाबा मंदिरातच अण्णांचे विविध कोनातून फोटो घेतले आहेत. आगामी अंकात अण्णांवर फिचर करण्यात येणार असल्याचेही त्यातील एकाने सांगितले.
भ्रष्टाचार विरोधात तसेच जनलोकपाल विधेयकासाठी अण्णांनी जे देशव्यापी आंदोलन केले त्याला भारतभरातील तरूणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाच पण परदेशातील भारतीयांनीही त्यांना पाठिबा दर्शविला. तसेच भारताचा शत्रू म्हणून जगभरात ओळख असलेल्या पाकिस्तानातूनही तेथील सामाजिक कार्यकर्त्यांचे एक पथक अण्णांच्या भेटीसाठी येथे आले आणि त्यांनीही पाकिस्तानात अण्णांना आमंत्रित करून अशीच चळवळ तेथेही सुरू करून देण्याची विनंती केली. गेल्याच आठवड्यात लोणावळा येथील सेलिब्रिटी म्युझियममध्ये अण्णांचा मेणाचा पुतळाही बसविण्यात आला. या व अशा अनेक घटनांमुळे अण्णांवर टाईम मासिकात फिचर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.