मराठी चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल – पद्मिनी कोल्हापुरे

पणजी,दि.२७नोव्हेंबर-‘मराठी चित्रपटांकडून ऑफर्स का येत नाहीत याची आपणास कल्पना नाही, परंतु चांगल्या ऑफर्स आल्यास त्यात जरूर काम करेन’, असे प्रतिपादन एकेकाळी आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर हिदी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांनी रविवारी इफ्फीत एका पत्रकार परिषदेत केले. दक्षिणेचे प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक व्ही. के. प्रकाश यांच्या ‘कर्मयोगी’ या नव्या मल्याळम् चित्रपटाच्या प्रिमियरच्या निमित्ताने पद्मिनी इफ्फीत दाखल झाल्या आहेत.
कर्मयोगी या चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे यांची प्रमुख भुमिका असून मल्याळी सूपरस्टार इंद्रजीत याने त्यात हिरोची भुमिका केली आहे. प्रकाश यांच्याकडून या चित्रपटाची ऑफर मिळाली आणि आपण त्यांना होकार दिला. चित्रपटातील भुमिकेबद्दल आपण पूर्ण समाधानी असून हा एक उत्कृष्ट चित्रपट असल्याचे त्यांनी सांगितले. ‘कर्मयोगी’ हा शेक्सपियरच्या ‘हेम्लेट’ च्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारीत आहे, मात्र चित्रपट स्थानिक परिस्थितीनुरूप आणि प्रादेशिकतेच्या आधारे बनवण्यात आलेला आहे. चित्रटातील अभिनय, नृत्य, संगीत, युध्दाची दृष्ये देशी असल्याचे, दिग्दर्शक प्रकाश यांनी सांगितले. या चित्रपटासाठी आपणास एक मध्यमवयीन आणि कसदार अभिनय करू शकणारी महिला कलाकार हवी होती. पद्मिनी कोल्हापुरे या त्यासाठी आपणास योग्य वाटल्या आणि त्यांनी तो विश्वासही सार्थ ठरवला, असेही प्रकाश म्हणाले.
सध्या मराठीत एकापेक्षा एक चित्रपट येत असताना, मराठी चित्रपटात काम करणे आवडेल का? या पत्रकारांच्या प्रस्नाला उत्तर देताना, मला मराठीकडून ऑफर्स का येत नाहीत हे तुम्ही त्यांना (निर्माते – दिग्दर्शक) विचारा असे पद्मिनी म्हणाल्या. लग्न लवकर झाल्याने हिदी चित्रपटांतून आपण लवकर निवृत्ती घेतली. गोव्याशी आपला जवळचा संबंध आहे. आपली आजी (मंगेशकर) गोव्याची आहे. आपणास गायिका म्हणून करियर करायचा होते, परंतु अभियन हेच करियर बनले परंतु आपण समाधानी आहोत, असेही आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.

Leave a Comment