कुलभूषण जाधव यांच्या फेरविचार याचिकेस नकारामागे पाकिस्तानचा दबाव; भारताचा आरोप

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कारागृहात बंद असलेले भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांनी फेरविचार याचिका दाखल करण्यास नकार दिला असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. जाधव यांनी दया याचिकेवरच कायम राहण्याचा निर्णय घेतल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. मात्र आता या निर्णयासाठी पाकिस्तान त्यांच्यावर दबाव टाकत असल्याचे भारताचे म्हणणे आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, पाकिस्तानने भारताला कुलभूषण जाधव प्रकरणात एफआयआर, पुरावे आणि न्यायालयाच्या आदेशासह कोणतेही पुरावे देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करत असल्याचा भ्रम निर्माण करत आहे.

कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी शक्य तो प्रयत्न केला जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

मंत्रालयानुसार, पाकिस्तानने जाधव यांच्यावर आंतरराष्ट्रीय न्याय कायद्याच्या अंमलबजावणीचा अधिकार त्यागण्यास भाग पाडले. जाधव यांनी फेरविचार याचिका दाखल करण्यास नकार दिला, हा दावा करून पाकिस्तान ढोंग करत आहे. हा निर्णय घेण्यास त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला आहे. तसेच, मागणी केल्यानंतरही जाधव यांची भारताला भेट घेऊन देण्यास पाकिस्तान नकार देत आहे.

Leave a Comment