
मुंबई: केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनी आज राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या सरकारच्या काळात राज्यातील दलित आणि बौद्धांवरील हल्ल्यात वाढ झाल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे ११ जुलै रोजी याविरोधात देशभरात आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणाही आठवले यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील दलित आणि बौद्धांवरील अत्याचारात वाढ
आठवले यांनी यावेळी म्हटले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील दलित आणि बौद्धांवर अत्याचारात वाढ होत असून महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या काळातही अनेक ठिकाणी दलित तरुणांची हत्या आणि अनेकांची घरे जाळल्याचे प्रकार घडले आहेत. पण या सगळ्याकडे राज्य सरकार अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. बौद्ध आणि दलितांवरील अत्याचार वाढत असताना ते रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याची टीका आठवले यांनी केली.
येत्या ११ तारखेला रिपब्लिकन पक्षातर्फे याविरोधात आवाज उठवण्यासाठी राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्याच्या बाहेर रिपब्लिकन पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात येईल. हे निषेध आंदोलन सोशल डिस्टन्सचे नियम पाळून आणि मास्क घालून करण्याची सूचना रिपब्लिकन कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले.
