दत्ता मेघे यांचा अण्णा हजारे यांना पाठिबा

वर्धा दि.२२ ऑगस्ट – शिक्षणसम्राट आणि काँग्रेसचे खासदार दत्ता मेघे यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांना सोमवारी पाठिबा जाहीर केला. अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधातील आंदोलनातील आपला वैयक्तिक पाठिबा असल्याचे मेघे यांनी सांगितले. मेघे म्हणाले की, भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे यांनी सुरु केलेले आंदोलन योग्य असेच आहे. माझा या आंदोलनाला वैयक्तिक पाठिबा आहे. अण्णांच्या मागण्या योग्य आणि पटणार्‍या आहेत. आंदोलन सुरु करण्याआधीच अण्णांना अटक करण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा होता.
काँग्रेसमधील काही नेत्यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनावर जोरदार टीका केली आहे. या नेत्यांनी आपल्या शब्दांत काँग्रेसची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेसच्या स्थापनेपासून काँग्रेस भ्रष्टाचाराविरोधात लढत आलेली आहे. याचा या नेत्यांना विसर पडलेला दिसतो. या नेत्यांनी अण्णांची माफी मागावी, असेही मेघे यांनी सांगितले.