केवळ राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण किवा पीएमओ कार्यालयाशी बोलण्याचा अण्णांचा निर्धार

नवी दिल्ली, दि. २२ ऑगस्ट, (हि.स.) – लोकपाल विधेयक आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन उपोषणास बसलेल्या समाजसेवक अण्णा हजारे यांनी तडजोड करण्यासाठी केवळ काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी, महाराष्ट*ाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा पंतप्रधान कार्यालयातील जबाबदार व्यक्तींशी बोलण्याची तयारी दर्शविली आहे. अन्य कोणत्याही मध्यस्ताशी आपण बोलणार नाही, असे हजारे यांनी एका खाजगी दूरचित्रवाहिनीला सांगितले.
गृहमंत्री पी. चिदंबरम किवा केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्याशी आपण चर्चा करणार नाही, असे सांगून अण्णा हजारे म्हणाले की, गैरसरकारी व्यक्तीशी आपण लोकपाल विधेयकाच्या अनुषंगाने चर्चा करणार नाही. आपण या मुद्यावर केवळ राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण किवा पंतप्रधान कार्यालयातील जबाबदार व्यक्तीशी चर्चा करु.

आंदोलनावर इमाम बुखारींची टीका
भ्रष्टाचारापेक्षा देशाला जातीयतेचा अधिक धोका असल्याचे सांगत दिल्लीच्या जामा मशिदीचे इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनावर टीका केली. जनपाल विधेयकाबाबतच्या आंदोलनात अण्णा हजारे यांनी मुस्लिमांना का सहभागी करुन घेतले नाही, असा सवाल उपस्थित करुन बुखारी म्हणाले की, महात्मा गांधी यांचे आंदोलन आणि अण्णा हजारे यांचे आंदोलन याची तुलना करता येणार नाही. अण्णांनी जे आंदोलन सुरु केले आहे, त्यामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक दिसत नाहीत. याउलट गांधीजींनी जेव्हा स्वातंत्र्याचे आंदोलन सुरु केले तेव्हा तळागाळातील लोक त्या आंदोलनात सामील झाले होते. अण्णा हजारे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती तसेच त्यांच्या आंदोलनात वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. या घोषणांनी मुस्लिमांचे कदापि समाधान होणार नाही. त्यांनी अण्णा हिदुस्थान झिदाबाद आणि भारत माता की जय अशा घोषणा का देत नाहीत. अण्णांनी आपल्या आंदोलनात मुस्लिमांना सामील करुन घेतले नाही किवा तसे आवाहनही केले नाही. उलट गांधीजींनी समाजातील प्रत्येक समाजाचे म्हणणे ऐकून घेतले.

Leave a Comment