आईला मरायची परवानगी नसते – सिधूताई सपकाळ

नागपूर दि.२१ ऑगस्ट – संकट आले तर महिला खचून जातात. प्रसंगी परिस्थितीसमोर नांगी टाकून स्वतःला संपवून टाकतात. हे भ्याडपणाचे लक्षण आहे. तेव्हा तुम्ही स्वतःला संपविण्याचा प्रकार करू नका. आईला तर मुलांना जगवायचे असते, त्यांना प्रेम द्यायचे असते म्हणून आईला मरायची परवानगी नसते असे प्रतिपादन सिधूताई सपकाळ यांनी येथे केले.
१४२ जावई व ४२ सुनांची सासू, १७२ पुरस्कारांच्या धनी असलेल्या सिधूताई सपकाळ यांनी शेकडो अनाथांची मी आई झाले, तुम्ही गणगोत व्हा, असे आवाहन करून उपस्थित प्रेक्षकांकडे मदतीचा हात मागितला. इनरव्हील क्लब ऑफनागपूर व स्वरवेधच्या संयुत्त* विद्यमाने आईच्या हृदयातून या विषयावर त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कांचन गडकरी होत्या. या प्रसंगी त्यांच्या हस्ते सिधूताईचा सन्मानपत्र, शाल, साडी व चोळी प्रदान करून सन्मान करण्यात आला. आपल्या ओघवत्या व थेट भाषेत बोलायला सुरुवात करून सिधूताईंनी सभागृहाचा ताबा घेतला. आईची महती सांगताना त्यांनी अनेक वचने, सुभाषिते, श्लोक यांची पेरणी करीत श्रोत्यांना बांधून ठेवले.
मातृहृदयाची महती सांगताना त्यांनी मनुष्याप्रमाणेच पशुपक्ष्यांमधील मातृभावाचे अनुभव कथन केले. मातृत्वाची महती सांगताना त्यांच्या व्याख्यानाची गाडी मध्येच आत्मकथनावर उतरली. त्यांच्यावर निघालेल्या चित्रपटाचा उल्लेख करीत त्यांनी लहानपणापासून भोगलेल्या हालअपेष्टांविषयी सांगणे सुरू केले. आपण कसे रेल्वेत भिक्षा मागत जगलो, स्मशानात राहिलो आदी प्रसंग त्यांनी सांगितले. जी मुलाचे सगळे गुन्हे माफ करते म्हणून तिला माउली म्हणतात, अशी मातेची महती सांगून त्यांनी चिमणीदेखील घरटे बांधताना कशी काळजी घेते, ते विशद केले.