जनलोकपाल विधेयक अमलात आणण्यात काही अडचण नाही – अजित पवार

पुणे,दि.२१- देशातील युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करेल, असे जनलोकपाल विधेयक प्रत्यक्षात येण्यात मला काही अडचण वाटत नाही कदाचित त्यासाठी सरकारलाही आपली भूमिका बदलावी लागेल व अण्णा हजारे यांनाही त्यांची भूमिका कांही प्रमाणात बदलावी लागेल, असे अुपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुण्यात जिल्हापरिषदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले. आजच्या कार्यक्रमास केंद्रीय कृषीमंत्री   ते या कार्यक्रमाला येवू शकले नाहीत. अजित पवार हे केंद्रीय राजकारणात कोणीही नाहीत, असे असले तरीही त्यांनी पुण्यातील कार्यक्रमात जनलोकपालविधेयकाबाबत जे मत व्यक्त केले आहे त्यावरून राष्ट्रीय परिस्थितीचा वातकुक्कुट काय दिशा दाखवतो हे समजण्यास त्यांचे विधान पुरेसे आहे.
श्री पवार पुढे म्हणाले, प्रशासनात पारदर्शकता हवी, ही बदलत्या वातावरणाची गरज आहे. सध्या देशात तरुणांच्या भावभावना काय आहेत, हे स्पष्ट होणारे वातावरण  आपण बघत आहोत. त्यांच्या आशाआकांक्षा पुर्‍या करण्याची जबाबदारी आपली आहे. त्या दृष्टीने सरकारची बाजू आणि अण्णा हजारे यांची बाजू या दोन्हीचा विचार करणारे जनलोकपालविधेयक येवू शकते असे मला वाटते. असे करताना सरकारच्या काही प्रामाणिक अडचणी आहेत यांचा विचारही संबंधितांनी केला पाहिजे. अण्णांच्या सारखा भला माणूस त्यांच्या मागण्यासाठी आमरण उपोषणाला बसला असताना त्यांना अटक करणे हे बरोबर नाही, असे माझे स्पष्ट मत यापूर्वीही मांडले आहे.
    श्री अजित पवार हे जिल्हापरिषदेच्या  कार्यक्रमात बोलत होते, त्यामुळे त्यांनी त्या संदर्भातील काही उदाहरणे दिली. ते म्हणाले, राज्यातील भ्रष्टाचार निपटून काढणे ही आपली जबाबदारी आहे, गेल्या काही वर्षात आपण मुलांना सायकली व महिलांना शिवणयंत्राचे वाटप केले आहे. त्यांचा दर्जा बघितला तर त्याचा उपयोग फारच कमी झाला आहे. यात आपण बदल करू शकणार नसू तर ते योग्य नव्हे . विदर्भात आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यासाठी पंतप्रधानांचे जे पॅकेज आले आणि त्याचे वाटप झाले त्याची अवस्था अतिशय दारूण आहे. वर्धा, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा वगैरे सहा जिल्ह्यांचा हा प्रश्न आहे. तेथे जे झाले त्यातून आपल्याला योग्य असा धडा घ्यावा लागेल. जिल्हापरिषदा आणि महापालिका यांच्या शाळांतील शिक्षणाचा दर्जा या सर्वांच्या चितेचा विषय असतो. ते शिक्षण दर्जेदारच असेल यादृष्टीने आपण पावले अुचलत आहोत.
राज्यातील पावसाच्या स्थितीबाबतही त्यांनी काही टिपणी केली ते म्हणाले, पश्चम महाराष्ट्रत पावसाची स्थिती चांगली आहे.पण विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी काळजीचा विषय आहे. पण गेल्या काही दिवसात केंद्रीय कृषीमंत्रालयाकडून उपग्रहाच्या आधारे उपलब्ध होणार्‍या छायाचित्राच्या व पावसाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. त्या भागातील विद्यमान पिकाला त्याचा चांगला उपयोग होअू शकेल.
ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले, पुढील  दोन ऑक्टोबरपासून देशात दारिद्र्य खालील कुटुंबे शोधण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमास प्रारंभ होत आहे. यापूर्वी याबाबत जी  कामे झाली आहेत ती न्यायालयात गेल्याने त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. आता भारत इलेक्ट्रॉनिक्सने तयार केलेल्या एक मशीनच्या आधारे अनेक प्रश्न विचारून व त्यावर त्या मशीनमध्ये केवळ टिक मार्क करून माहिती संकलित होणार आहे व ती त्या मशीनमधूनच दिल्लीला जाणार आहे. तेथे त्यावर प्रक्रिया होणार आहे व निष्कर्ष निघणार आहेत. हा कार्यक्रम राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. खोटी माहिती भरून त्याचा लाभ उठवणारास त्याचा त्रासच होईल, याची त्यात व्यवस्था आहे. या कार्यक्रमास सर्व यंत्रणेने आणि लोकप्रतिनिधीनी चांगला प्रतिसाद द्यावा, अशी विनंती आहे.