रिलिजन हे धर्माचे एक अंग -डॉ. सदानंद सप्रे

नागपूर दि.१३ ऑगस्ट -धर्म ही व्यापक संकल्पना आहे.धर्म म्हणजे ब्रह्मांडाचे नियम अशी व्याख्या विश्वकोशात आढळते. रिलिजन हे धर्माचे एक अंग आहे पण इंग्रजांनी धर्मालाच रिलिजन समजून त्याला संकुचित केले, असे प्रतिपादन सहसंयोजक व भोपाळचे डॉ. सदानंद सप्रे यांनी केले. धंतोली येथील हिदू धर्म संस्कृती मंदिराच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीजद्वारे डॉ. सदानंद सप्रे यांचे हिदू धर्मांची वैज्ञानिकता विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आयसीसीएसचे अध्यक्ष विराग पाचपोर व इतर मान्यवर उपस्थित होते.
धर्म हा विषय केवळ ज्येष्ठ मंडळींशीच संबंधित असल्याचा समज आपल्यामध्ये दृढ आहे. हा विषय युवकांसमोर ठेवायचा असेल तर त्याला वैज्ञानिकतेची जोड द्यावी लागेल, असे ते म्हणाले. ब्रह्मांडात सर्व ग्रह, तारे अतिशय काटेकोरपणे नियमांत बांधल्यासारखे फिरत असतात. क्वचित त्यांच्यात संघर्ष झाल्याचे दिसून येते. हेच सामंजस्य मनुष्याच्या जीवनातही दिसले तर संघर्ष निर्माण होणार नाही, असे सांगताना डॉ. सप्रे म्हणाले, व्यक्तीचा इतर व्यक्तीशी संबंध येतो, तसा तो सृष्टीशी देखील येतो. मग या सृष्टीचे काय प्रयोजन आहे, त्यात आपली काय भूमिका आहे, असा प्रश्न प्रत्येक मानवाला पडला पाहिजे. त्याचे उत्तर शोधण्यासाठी रिलिजन आपल्याला मदत करीत असतो. पर्यावरण, विश्वशांती असे विषय घेऊन धर्माचा अर्थ युवकांना समजावून सांगण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.