
नवी दिल्ली – भारत-चीन या दोन्ही देशांमधील संबंध गलवान खोऱ्यातील संघर्षामुळे सध्या अत्यंत वाईट अवस्थेत असताना आता वेगवेगळी आमिषे दाखवून चीन बांग्लादेशला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत आहे. बांग्लादेशबरोबर भारताचे उत्तम संबंध आहेत. भारताचा अत्यंत जवळचा विश्वासू सहकारी असलेला बांग्लादेश हा देश आहे. भारताच्या शेजारी देशांना व्यापार आणि पैशाच्या बळावर आपल्या बाजूला वळवून भारताची कोंडी करण्याची चीनची खेळी आहे.
नेपाळनंतर आता बांग्लादेशाला आपल्या बाजूला वळवण्यासाठी चीनची नवी खेळी
भारत-चीनचे सैन्य लडाखमध्ये आमने-सामने उभे ठाकलेले असतानाच उत्तराखंडमधील भारतीय प्रदेशांवर नेपाळने दावा केल्यानंतर संविधानिक दुरुस्ती करुन कालापानी, लिम्पियाधुरा, लिपूलेख या भारतीया प्रदेशांचा नेपाळने आपल्या नकाशामध्ये समावेश केला. हा सर्व निव्वळ योगायोग नाही. चीन यामागे असल्याचे संकेत काही दिवसांपूर्वी भारतीय लष्करप्रमुखांनी दिले होते. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
भारताचे २० जवान गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात शहीद झाले. भारत सध्या चीनच्या या आगळीकीली प्रत्युत्तर देण्यासाठी वेगवेगळया पर्यायांवर विचार करत आहे. खासकरुन चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान चीनने आता बांग्लादेशला आमिष दाखवले आहे.
चीनने बांग्लादेशला ५१६१ वस्तुंच्या व्यापारावरील ९७ टक्के शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. बांग्लादेशने अविकसित देश असल्यामुळे शुल्कामध्ये माफी मागितली होती आणि योगायोग म्हणजे गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दुसऱ्याचदिवशी १६ जूनला बांग्लादेशच्या या मागणीला चीनने सकारात्मक प्रतिसाद दिला. बांग्लादेशला हा लाभ येत्या एक जुलैपासून मिळणार आहे. या खेळीमागे चीनची बांग्लादेशबरोबरील मैत्रीसंबंध अधिक दृढ करण्याची भूमिका आहे. त्याचबरोबर बांग्लादेशचा शुल्कमाफीमुळे आर्थिक लाभ होणार आहे.
