वांद्रे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यापासून सोनू सूदला रोखले


मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या स्वगृही पोहोचविण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सोनू सूद करत आहे. सोनूने आतापर्यंत हजारो परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली आहे. सोनूने कालही काही मजुरांच्या प्रवासाची व्यवस्था केली होती. सोनू या सर्वांना निरोप देण्यासाठी स्वत: वांद्रे टर्मिनस येथे पोहोचला होता. पण प्लॅटफॉर्मवर जाण्यापासून त्याला रोखण्यात आले.

परंप्रांतीय मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांची उत्तर प्रदेशच्या आजमगड येथे जाण्यासाठी सोनू सूदने ट्रेनची व्यवस्था केली होती. सोनू यावेळी स्वत: या सर्वांना निरोप देण्यासाठी वांद्रे टर्मिनस येथे आला होता. पण प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी त्याला नाकारण्यात आली. जवळपास 45 मिनिट सोनू वांद्रे टर्मिनस येथील आरपीएफच्या ऑफिसमध्ये बसून पोलिसांशी चर्चा करत होता. पण तरीही त्याला परवानगी देण्यात आली नाही. नाव न घेण्याच्या अटीवर एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली की, मुंबईच्या विभागीय व्यवस्थापकांकडून सोनूला प्लॅटफॉर्मवर न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

सोनूला वांद्रे टर्मिनसमधून बाहेर पडल्यावर प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी का मिळाली नाही याबाबत विचारले असता, यामुळे मला काहीही फरक पडत नाही. की मला प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी मिळाली की नाही. मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवणे हे माझे काम आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी येथे आलो होतो, असे सोनूने म्हटले.

सोनूला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता, त्यावर उत्तर देणे सोनूने टाळले. मजुर आणि कामगारांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी अनेकांचे सहकार्य मिळत आहे. या सर्वांचा मी आभारी असल्याचे सोनूने म्हटले. 1 जून रोजी सोनूने ठाण्यातून 2 श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून जवळपास 1000 प्रवाशांची त्यांच्या गावी जाण्याची सोय केली होती. या सर्वांना निरोप देण्यासाठी सोनू स्वत: तिथे हजर झाला होता.

Leave a Comment