राज्यातील या जिल्ह्याचा मृत्यूदर देशापेक्षाही चारपट जास्त


जळगाव – देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई आणि पुणे ही दोन शहरे सध्या कोरोनामुळे फार चर्चेत आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक मुंबईत असून त्यापाठोपाठ पुण्याचा क्रमांक आहे. पण त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या राज्यातील जळगाव जिल्ह्यात जास्त आहे. देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदरापेक्षा चारपट जास्त जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर आहे. तब्बल ११२ जणांचा मागील ३० दिवसांच्या कालावधीत कोरोनामुळे बळी गेला आहे.

कोरोनामुळे देशातील मृत्यूदर २.८ टक्के एवढा आहे. तर जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर १२.३ टक्के आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात झोप उडवणारी परिस्थिती आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, अमळनेर आणि पाचोरा या चार शहरात ४ जून पर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला आहे.

महिनाभरापूर्वीचे याविषयी धोक्याचा इशारा जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी दिला होता. जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा त्यावेळी ४२ होता. तर १४ जणांचा मृत्यू झाला होता. १४ जणांना केवळ पाच दिवसात जीव गमवावा लागला होता. त्यानंतर पुढील ३० दिवसांच्या कालावधीत जळगाव जिल्ह्यात १०० पेक्षा अधिक जणांचा संसर्ग होऊन मृत्यू झाला. मृतांपैकी ६० जणांचे वय ६० पेक्षा अधिक होत. ५० ते ६० या वयोगटातील ४७ जण होते. तर ४० ते ५० वयोगटातील ५ जण होत्या. जिल्ह्याचा मृत्यूदर या मृत्यूमुळे एका महिन्याच्या काळात देशातील मृत्यूदरापेक्षा चारपट अधिक झाला आहे. राज्य सरकारने आता प्रत्येक व्यक्तीच्या मृत्युच्या कारणांची चौकशी करण्यासाठी १० सदस्यीय समिती नियुक्ती केली आहे.

जळगावमध्ये वाढलेल्या मृत्यूदरामागे आरोग्याकडे दुर्लक्ष, कर्मचारी आणि डॉक्टरांच्या समुपदेशनाचा अभाव, चाचण्या करण्यास होत असलेला विलंब, रुग्णांवर लक्ष ठेवण्याकडे होत असलेले दुर्लक्ष आणि विलगीकरण कक्षात सर्वसामान्य नागरिकांना सहज मिळणारा प्रवेश, यासारख्या कारणांमुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे काही संशयित रुग्णांचे जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वॅब घेण्यात आले होते. तीन जून रोजी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी २२ जणांचे स्वॅब गहाळ झाल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारला याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली. हे स्वॅब धुळे येथील प्रयोगशाळेत हरवले असून, त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.

Leave a Comment