देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीची दोन लाखांकडे वाटचाल


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सलग तिसऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, काल दिवसभरात आठ हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात गेल्या चोवीस तासांमध्ये ८,१७१ रुग्णांची नोंद झाल्यामुळे देशभरातील एकूण रुग्णांची संख्या एक लाख ९७ हजार ५८१ वर पोहोचली आहे. भारत कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या दहा देशांमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. आठवडय़ापूर्वी भारत सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या यादीत नवव्या क्रमांकावर होता. पण आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या फ्रान्समधील रुग्णांपेक्षा जास्त झाली आहे.

देशात मागील २४ तासांत २०४ जणांनी आपला जीव गमावला आहे, तर आतापर्यंत ५ हजार ५९८ जणांचा बळी गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील ९५ हजार ५२६ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर देशभरात सध्या ९७ हजार ५८१ जणांवर उपचार सुरू आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.१९ टक्क्यांवर पोहोचले आहे. हे प्रमाण १८ मे रोजी ३८.२९ टक्के होते.आतापर्यंत ३८ लाख ३७,२०७ नमुना चाचण्या झाल्या असून दररोज एक लाख चाचण्या करता येणे शक्य झाले आहे.

Leave a Comment