राज्यातील जनतेला उद्धव ठाकरेंनी केली रक्तदान करण्याची विनंती


मुंबई – कोरोनाच्या प्रादुर्भावाशी संपूर्ण देश लढत असून दिवसेंदिवस महाराष्ट्रातीलही कोरोना बाधितांच्या आकड्यांमध्ये वाढ होत आहे. राज्य सरकार परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांबद्दल रविवारी राज्यातील जनतेशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. कोरोना आणि इतर आजारांशी लढणाऱ्या रुग्णांसाठी महाराष्ट्राला पुन्हा एकदा रक्तदानाची गरज असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलत असताना हात जोडून राज्यातील जनतेला रक्तदान करण्याची विनंती केली.

आपल्याला कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात रक्ताचा तुटवडा जाणवला होता. यानंतर आम्ही आवाहन केल्यानंतर त्याला राज्यातील जनतेने चांगला प्रतिसाद दिला. जनतेने दिलेल्या प्रतिसाद एवढा उदंड होता की आम्हाल आता रक्ताची गरज नाही, पुरेसा साठा आहे असे सांगावे लागले. पण गेल्या काही दिवसांत कोरोना आणि इतर आजारांमुळे रुग्णसंख्येत होत असलेली वाढ पाहता, राज्याला पुन्हा एकदा रक्तदानाची गरज असल्यामुळे रक्तदान करणे ज्या व्यक्तींना शक्य आहे त्यांनी रक्तदान अवश्य करावे, अशी विनंती उद्धव ठाकरेंनी जनतेला केली.

राज्यात येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा गुणाकार वाढण्याची शक्यता आहे. पण सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून आपण हे थांबवू शकतो. मे महिन्याच्या अखेरीस राज्यात सव्वा ते दीड लाखापर्यंत कोरोनाबाधित रुग्ण होतील असा अंदाज केंद्राकडून तपासणीसाठी आलेल्या पथकाने वर्तवला होता. पण राज्यातील जनेतेने आतापर्यंत पाळलेल्या लॉकडाउनमुळे हा आकडा ३३ हजारापर्यंत रोखून ठेवण्यात आपल्याला यश आले आहे, हे केवळ आपल्या सहकार्यामुळे शक्य झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक पिढ्यांनी न पाहिलेली परिस्थिती आज आहे. मुस्लिम बांधवांना मी विनंती करतो की कोरोनाचे संकट नष्ट होवो अशी दुवा मागा. लॉकडाउन केला आणि आपण त्यातून काय साधले याची कल्पना देतो. काहींना अजूनही याचे गांभीर्य कळत नाही. याचा अर्थ काय? ते तुम्हाला समजले असेल. मास्क सक्तीचा का? हात का धुवायचा? या संदर्भातील बॅनर्स लावले आहेतच. कोरोनासोबत जगायचे म्हणजे काय ? ते मी सांगतो आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आपल्याला ही काळजी पुढचे काही दिवस घ्यावी लागणार आहे.

Leave a Comment