परप्रांतियांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन, तुम्ही महाराष्ट्रात आहात चिंता करू नका


मुंबई : लॉकडाऊनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढ केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी व्हिडीओ कॉन्फरँसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. राज्य सरकार कोरोनाचा सामना करण्यासाठी काय उपाययोजन करत आहे, याची माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी जनतेला दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील उद्योगधंदे सुरु करण्याबाबत 20 एप्रिलनंतर निर्णय घेऊ असे सांगितले. वैद्यकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राची माहिती असणाऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले होते, याला जवळपास 21 हजार जणांनी प्रतिसाद दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.

त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी परराज्यातील नागरिकांना, मजुरांनाही मोठ्या आपुलकीने आवाहन केले आहे. तुम्ही घाबरू नका, आमच्यासोबत राहा. महाराष्ट्रात तुम्ही असून चिंता करण्याचे काही कारण नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. आपण एकजुटीने कोरोनाच्या संकटाशी सामना करु. परराज्यात जाणाऱ्या ट्रेन आजपासून सुरु होतील, असे या मजुरांना वाटले होते. त्यामुळे हे सर्वजण वांद्रे स्टेशनबाहेर जमले होते. राज्य सरकार तुमची काळजी घेत असून या गोरगरीब जनतेच्या भावनांशी खेळू नका आणि राजकारण करु नका. या संकटाचा कुणी गैरफायदा घेतला तर त्यांना सोडणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला.

कोरोनानंतर येणाऱ्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी एक टीम करण्यात आली असून या टीमचे नेतृत्व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार करत आहेत. ही टीम राज्यातील आर्थिक बाबींचा अभ्यास करणार आहे. राज्यातील उद्योगधंदे सुरु करता येतील का याचा अभ्यास सुरु आहे. याबाबत येत्या 20 एप्रिलनंतर निर्णय घेऊ. याशिवाय विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींना एकत्र आणून त्यांना या कोरोनाच्या लढाईत एकत्र येण्याचे आवाहन केले जात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आज एकत्र आहेत. सर्व नेत्यांशी मी बोलत आहे. अनेक मौलवींशी बोलत आहे. आपण आज एकजूट दाखवली पाहिजे. या एकजुटीच्या जोरावर आपण हे युद्ध जिंकू, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment