
नवी दिल्ली – केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केल्यानंतरही देशातील परिस्थिती लक्षात घेता हे लॉकडाउन काही राज्यांमध्ये ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आले आहे. पण भारतीय अर्थव्यस्थेवर या लॉकडाउनचा मोठा परिणाम होत आहे. या काळात अनेक कंपन्या बंद असल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे. त्याचबरोबर अनेक छोटे उद्योगधंदे, शेतकरी यांच्यावरही लॉकडाउनमुळे परिणाम होत आहे. अशा खडतर परिस्थितीत सरकारने आपल्याकडे विचारणा केल्याल्यास आपण कधीही मदत करायला तयार असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे माजी अध्यक्ष रघुराम राजन यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
खडतर परिस्थितीत सरकारने विचारल्यास आपण मदत करायला तयार
संपूर्ण जग हे सध्याच्या घडीला आर्थिक मंदीच्या दिशेने झुकत चालले आहे. मला आशा आहे की पुढील वर्षात ही परिस्थिती सुधारलेली असेल. पण कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सध्या आपण काय पावले उचलत आहोत, हे त्यावर पूर्णपणे अवलंबून असणार आहे. परकीय चलन हा भारतासाठी कायम चिंतेचा विषय राहिलेला आहे. सध्या इतर विकासनशील देशांच्या तुलनेत आपली परिस्थिती ही चांगली आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण हा देखील एक चिंतेचा विषय आहेच, पण ब्राझील सारख्या देशात सध्याची असलेली परिस्थिती पाहता भारतामध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत सरकारने त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यायला हवा, मग ते विरोधी पक्षातील का असेना. भारताच्या आर्थिक परिस्थितीबद्दल रघुराम राजन बोलत होते. त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीत सरकारने आपल्याला मदत मागितली तर आपण कधीही तयार असल्याचेही राजन यांनी यावेळी स्पष्ट केले.
