लॉकडाऊनदरम्यान बर्थडे पार्टी करणाऱ्या पनवेलमधील भाजप नगरसेवकावर गुन्हा


नवी मुंबई : एकीकडे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकार, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा प्रयत्नशील असताना, शासन नियमांना लोकप्रतिनिधीच केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन दरम्यान बर्थडे पार्टी करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात लॉकडाऊन आणि जमावबंदी असताना देखील मित्रांसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणारा पनवेलमधील भाजप नगरसेवक अजय बहिरा यांच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवकसह त्याच्या 11 कार्यकर्त्यांविरोधात देखील गुन्हा दाखल झाला आहे.

स्वत:च्या घरी नगरसेवक अजय बहिरा यांनी बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. ते राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर मित्रांसोबत सेलिब्रेशन करत होते. पण याठिकाणी पोलिसांनी अचानक धाड टाकली असता तिथे 11 जण उपस्थित होते. त्यांनी यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नव्हते. तसंच जमावबंदी असताना एकत्र येणे, मास्क न घालणे इत्यादी गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत.

पनवेलमधील प्रभाग क्रमांक 20 चे अजय बहिरा हे भाजप नगरसेवक आहेत. अजय बहिरा यांचा 10 एप्रिल रोजी वाढदिवस होता. लॉकडाऊन असल्याने त्यांनी घरीच बर्थडे पार्टीचे आयोजन केले आणि मित्रांनाही आमंत्रित केले. परंतु राज्यात संचारबदी असल्याने चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मज्जाव आहे. तरीही अजय बहिरा यांच्यासह 11 जण इमारतीच्या गच्चीवर पार्टी करत होते.

संचारबंदीचे नियम यावेळी पायदळी तुडवण्यात आलेच, पण सोशल डिस्टन्सिंगलाही या नगरसेवकांकडून हरताळ फासला गेला. शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे अनिवार्य असताना, कोणीही याचे पालन न केल्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून नगरसेवकासह अकरा जणांवर गुन्हा दाखल केला.

Leave a Comment