रत्नागिरीतील 34 पैकी 21 जणांना कोरोनाची लागण नाही


रत्नागिरी : गुढीपाडव्याच्या दिवशी पुण्यातील पहिल्या कोरोना ग्रस्त दाम्पत्याला डिस्चार्ज देण्यात आला असून कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही बाब महत्त्वाची मानली जात आहे. त्यानंतर रत्नागिरीतील 34 पैकी 21 जणांचे कोरोनाचे रिपोर्ट आता समोर आले आहेत. या 21 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. तर उर्वरित 13 जणांचा अहवाल अद्याप आलेला नाही. रत्नागिरीत सध्या तरी एकजण कोरोनाग्रस्त असून जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती देखील सुधारत आहे. तर, त्याच्या पत्नी आणि भावाचे रिपोर्ट देखील यापूर्वीच निगेटिव्ह आले आहेत.

दिवसेंदिवस देशभऱातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. भारत सध्या तरी दुसऱ्या स्टेजवर कोरोनाशी सामना करत आहे. सारी परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा मात्र या काळात सुरळीत सुरु राहणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी आणि त्याला संपवण्यासाठी हा काळ महत्त्वाचा असून देशवासियांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले आहे. शिवाय, राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घेतलेल्या निर्णयांचे आता सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. पण, यामध्ये नागरिकांचे सहकार्य हे महत्त्वाचे आहे.