नेदरलंड मध्ये गांजा खरेदीसाठी लांब रांगा


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
जगात करोना उद्रेकाचे भय बाळगून तमाम जनता जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यात मग्न आहे आणि त्यातही सॅनीटायझर, मास्क अश्या गोष्टी प्रामुख्याने खरेदी करत आहेत, प्रसंगी त्यासाठी रांगा लावत आहेत. नेदरलंड बाजारातील एक फोटो नुकताच प्रसिध्द झाला असून यातही लोकांच्या दुकानासमोर रांगा दिसत आहेत. मात्र या रांगा गांजा खरेदीसाठी आहेत.

नेदरलंड मध्ये गांजा विकणे, ओढणे याला कायदेशीर परवानगी आहे. गांजा विक्री करणाऱ्या दुकानांना कॉफी शॉप म्हटले जाते. नेदरलंड मध्येही करोनाच्या भीतीने बाजार बंद केले जात आहेत, शाळा बंद आहेत. अश्या परिस्थितीत अन्य सामानाबरोबर लोक गांजाची साठवण करत आहेत. अर्थात येथे मर्यादित प्रमाणात गांजा खरेदीची परवानगी आहे.

नागरिकांना करोना मुळे किती दिवस बाजार बंद राहतील याचा अंदाज येत नसल्याने कदाचित पुढचे दोन महिने गांजा खरेदी शक्य होणार नाही असे वाटत असल्याने पुरेशी तरतूद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची बातमी एएफपीने दिली आहे. सुपरमार्केट मध्ये बहुतेक वस्तूंची टंचाई जाणवत असून टॉयलेट पेपर, पास्ता मोठ्या प्रमाणावर खरेदी केले गेल्याने या वस्तू संपल्या आहेत. नवीन पुरवठा ठप्प झाला आहे असेही समजते.

Leave a Comment