
फोटो सौजन्य भास्कर
करोना विषाणूने जगभरात ५ हजारावर बळी घेतल्यामुळे धास्तावलेल्या लोकांनी लॉस एंजेलिस येथील हॉलीवूड फॉरएव्हर सिमेट्री मध्ये कबर जागा बुकिंग साठी गर्दी केल्याचे वृत्त इंग्रजी वेबसाईट टीएमझेडने दिले आहे. आपल्याला मरण आलेच तर आपल्या आवडत्या स्टारच्या कबरीजवळ आपल्यालाही चिरविश्रांती मिळावी म्हणून लोक मोठ्या रकमा मोजण्यास तयार असल्याचे यात म्हटले गेले आहे.
हॉलीवूड सिमेट्री मध्ये बुकिंगसाठी गर्दी
१८९९ मध्ये हॉलीवूड मधील ही सिमेट्री सुरु केली गेली. ज्युडी गार्लेंड, क्रीस कॉर्नेल, सेसिल डी मिल, जेनेट गॅनॉर असे दोनशेहून अधिक प्रसिद्ध आणि लोकांच्या हृदयात कायम स्थान मिळविलेले कलाकार येथे दफन केले गेले आहेत. त्यामुळे अनेक लोकांना त्याच्या आवडत्या कलाकाराच्या शेजारी आपलीही दफनाची जागा असावी असे वाटते आहे.
दरम्यान करोनामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली असून सर्व शाळा, संस्था बंद आहेत. सर्व खेळांचे कार्यक्रम १ महिन्यासाठी रद्द केले गेले आहेत. न्युयॉर्क टाईम्सच्या बातमीनुसार अमेरिकेत करोना वेगाने पसरत असून आत्तापर्यंत १६६० जणांना त्याची लागण झाली आहे तर मृतांची संख्या ४१ वर गेली आहे. त्यात वॉशिंगटन येथे ३१, कॅलिफोर्निया मध्ये ४, फ्लोरिडा मध्ये २, जॉर्जिया, न्यूजर्सी, साउथ डकोटा आणि कॅन्सास मध्ये प्रत्येकी १ मृत्यु नोंदविले गेले आहेत.
