कोरोनाचा संसर्ग झालेल्या चालकांना उबर देणार भरपाई

चीनमधून पसरलेला कोरोना व्हायरस आता भारतासह जगभरात थैमान घालत आहे. भारतात देखील 40 पेक्षा अधिक जणांना या व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. आता कॅब सर्व्हिस कंपनी उबरने घोषणा केली आहे की, चालकाला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यास त्याला भरपाई देण्यात येईल. जे चालक कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे अथवा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना वॉर्डमध्ये ठेवल्याचे कागद दाखवतील, त्यांना 14 दिवसांपर्यंत भरपाई देण्यात येईल.

उबरच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, जगभरात हे लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

उबरनंतर अन्य टॅक्सी शेअर आणि डिलिव्हरी कंपन्यांनी देखील संकेत दिले आहेत की ते देखील असेच पाऊल उचलू शकतात. भारतात देखील या व्हायरसचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. भारतातील नागरिक साफ-सफाई, स्वच्छतेबाबत अधिक जागृक नसल्याने या व्हायरसचा धोका भारतात अधिक आहे. त्यामुळे उबर-ओला सारख्या सेवा वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे.

कॅबमधून दररोज अनेक प्रवासी प्रवास करत असतात, त्यामुळे कारमधील अनेक गोष्टींना स्पर्श होत असतो. याच कारणामुळे चालक आणि इतर प्रवाशांना व्हायरसचा संसर्ग लवकर होण्याची शक्यता असते. अशा परिस्थिती विशेष काळजी घेण्याची गरज आहे.