प्रजासत्ताक दिनासाठी आलेल्या ‘वादग्रस्त’ पाहुण्याचा होत आहे विरोध


नवी दिल्ली : सध्या भारत दौऱ्यावर ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर मेसियस बोल्सोनारो असून ते यंदाच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे असणार आहेत. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गेल्याच वर्षी राष्ट्रपती झालेल्या बोल्सोनारो हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. ब्राझीलचे डोनाल्ड ट्रम्प असेही त्यांना म्हटले जाते. ब्राझीलच्या राष्ट्रपतीपदाची 2018 मध्ये त्यांनी निवडणूक जिंकली. त्यानंतर 2019 मध्ये बोल्सानारो यांनी पदभार स्वीकारला.

बोल्सोनारो डाव्यांचे सरकार उलथवल्यानंतर सत्तेत आल्यामुळे प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्याला विरोध केला जात आहे. महिलांबद्दल तसेच समलैंगिक समुदायाबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यांनी ब्राझीलच्या संसदेत वादविवादावेळी विरोधी पक्ष नेत्या मारिया डो रोजारिओ यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका केली होती. मी तुझ्यावर बलात्कार करणार नाही कारण तु त्या लायकीची नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यांनी या वादग्रस्त वक्तव्यानंतरही माफी मागितली नव्हती.

बोल्सानारो यांच्यावर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीदरम्यान चाकू हल्ला झाला होता. त्यांच्या पोटात चाकू खुपसण्यात आला होता. बोल्सोनारो यांनी 2017 मध्येही त्यांच्या अपत्यांबद्दल माहिती देताना मुलीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले की, माझी पाच मुले आहेत. त्यातील चार मर्द असून पाचवे अपत्य कमजोरीच्या वेळी जन्माला आले जी मुलगी आहे.

बोल्सोनारो यांनी समलैंगिक लोकांविरोधात जाहीरपणे मत मांडले होते. ब्राझीलचे तत्कालीन राष्ट्रपती फर्नांडो कार्डोसो हे 2002 मध्ये समलैंगिक लोकांच्या अधिकारासाठी लढत असताना बोल्सोनारो यांनी त्यात सहभागी होण्यास नकार दिला होता. ते म्हणाले होते की, मी यासाठी नाही लढणार, जर मला दोन पुरुष किस करताना दिसले तर त्यांना तिथेच चोप देईन.

ऊस हेसुद्धा बोल्सोनारो यांना विरोध होण्यामागे एक कारण आहे. भारत आणि ब्राझील यांच्यात जागतिक बाजारपेठेत साखरेच्या उत्पादनात स्पर्धा असते. वर्ल्ड ट्रे़ड ऑर्गनायझेशनमध्ये ब्राझील नेहमीच भारताविरुद्ध म्हणणे मांडत असते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भारत मर्यादेपेक्षा जास्त मदत करतो, असा आरोप त्यांच्याकडून होत असतो.

Leave a Comment