हा गुप्तहेर बनणार होता थेट शत्रूराष्ट्राचा संरक्षणमंत्री

गुप्तहेर आपले प्राण धोक्यात घालून दुसऱ्या देशाची माहिती आपल्या देशातील गुप्तहेर संस्थेला पाठवत असतात. मात्र हे काम जेवढे ऐकायला सोपे वाटते, तेवढे निश्चितच नसते. जर हे गुप्तहेर दुसऱ्या देशात पकडले गेले तर त्यांना कठोर शिक्षेला सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गुप्तहेराबद्दल सांगणार आहोत, जो दुसऱ्या देशात जाऊन चक्क उपसंरक्षणमंत्री होणार होता.

या गुप्तहेराचे नाव आहे एली कोहेन. ते इस्त्रायलचे गुप्तहेर होते. त्यांनी असे काही केले होते की ज्याबद्दल त्यांच्या देशाने देखील विचार केला नसेल. कोहेन यांनी अशी माहिती मिळवली होती की ज्यामुळे 1967 च्या अरब-इस्त्रायल युद्धात इस्त्रायलचा विजय झाला.

Image Credited – Amar ujala

एली कोहेन हे 1961 ते 1965 ही चार वर्ष इस्त्रायल गुप्तहेर म्हणून सीरियामध्ये राहिले. एक उद्योगपती म्हणून त्यांनी सीरियामध्ये आपली स्वतःची वेगळी ओळख मिळवली. याद्वारे ते सीरियन सत्तेच्या खूप जवळ पोहचले. यावेळी तेथील सत्तापालटात देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते सीरियाच्या राष्ट्रपतींच्या खूप जवळ आले होते. ते राष्ट्रपतींना संरक्षण प्रकरणात देखील सल्ला देत असे.

एली यांचा जन्म 1924 ला इजिप्तच्या अ‍ॅलेग्झेंड्रिया येथे झाला. 1914 मध्ये त्यांचे वडील सीरियामधल्या अलेप्पोमध्ये स्थायिक झाले 1948 मध्ये इस्त्रायलच्या निर्मितीनंतर अनेक यहुदी कुटुंबांनी सीरिया सोडले. यात एलीन यांचे कुटुंब देखील होते. मात्र या काळात ते इजिप्तमध्येच थांबले. कारण त्यांचे इलेक्ट्रॉनिकचे शिक्षण अपुर्ण होते. त्यांचे अरबी, इंग्रजी आणि फ्रांसीसी भाषेवर प्रभुत्व होते. त्यामुळेच ते इस्त्रायलच्या गुप्तहेर संघटनेच्या नजरेत आले.

Image Credited – Amar ujala

1957 मध्ये इस्त्रायलला आल्यावर त्यांनी ट्रांसलेटर आणि अकाउंटेट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. याचवेळी त्यांनी इराकी-यहुदी मुलगी नादिया मजाल्द बरोबर लग्न केले.

1960 मध्ये एली इस्त्रायलच्या गुप्तहेर संघटनेत सहभागी झाले. 1961 मध्ये त्यांना मिशनवर पाठवण्यात आले. एली कोहेन यांना कामिल अमीन ताबेत नाव देण्यात आले होते व त्यांना एक उद्योगपती म्हणून अर्जेंटीनाचा राजधानी ब्यूनस आयर्समध्ये पाठवण्यात आले. त्यांनी सीरियन समुदायाच्या लोकांशी संपर्क वाढवला व हळूहळू सीरियन दुतावासातील अधिकाऱ्यांशी देखील मैत्री केली.

Image Credited – Amar ujala

वर्ष 1962 मध्ये ते  सीरियाची राजधानी दमास्कला जाऊन स्थायिक झाले. तेथूनच ते रेडिओ ट्रांसमिशनद्वारे सीरियन सैन्याची गुप्त माहिती इस्त्रायलला पाठवू लागले. 1963 मध्ये सीरियातील सत्तापालट करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. राष्ट्रपती झालेल्या अमीन अल-हफीज यांनी एली यांनी उपसंरक्षणमंत्री बनवण्याचा देखील निर्णय घेतला होता. मात्र 1965 मध्ये सीरियाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रेडिओ ट्रांसमिशनद्वारे संदेश पाठवताना पकडले.

Image Credited – Amar ujala

एली कोहन यांच्यावर सीरियात लष्करी कारवाई झाली व त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. 1965 मध्ये दमास्कसमध्ये सार्वजनिक रित्या एका चौकात त्यांना फासावर लटकवण्यात आले. यावेळी त्यांच्या गळ्यात एक बॅनर देखील लटकवण्यात आले. त्यावर लिहिले होते ‘सीरियातील अरब लोकांकडून’. फाशी दिल्यानंतर एली यांचे मृत शरीर देखील सीरियाने इस्त्रायलला परत पाठवले नाही. इस्त्रायलने त्यांची शिक्षा माफ करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र सीरियाने यास नकार दिला.

Leave a Comment