
मुंबई : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेले नसून विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही शिवसेना-भाजपचे मुख्यमंत्रिपदावरून बिनसल्यामुळे निवडणुकीआधी बॅकफूटवर असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आता केंद्रस्थानी आले आहेत. कारण सत्तास्थापनेसाठी या दोन्ही पक्षांसोबत शिवसेनेची चर्चा सुरू आहे. पण अशातच दिल्लीच्या राजकारणात आता नवी चर्चा जोर धरत आहे.
शरद पवारांना भाजपकडून राष्ट्रपतीपदाची ऑफर?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपने राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली आहे. तसेच राज्यातील आणि केंद्रातील सरकारमध्ये राष्ट्रवादीला सन्माजनक वाटा देण्याचे आश्वासनही देण्यात आल्याचे वृत्त एनडीटीव्ही इंडिया या वृत्तवाहिनीसह इतर काही माध्यमांनी दिले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या वृत्तामुळे खळबळ उडाली आहे. पण अद्यापपर्यंत कोणत्याही नेत्याने राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या या कथित ऑफरबद्दल अधिकृत भाष्य केलेले नाही.
