
नवी दिल्ली – २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अपूर्ण राहिलेल्या शतकाची भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने कहाणी सांगत ‘कॅप्टन कुल’ महेंद्रसिंह धोनीला दोषी ठरवले आहे. धोनीने मला शतकापासून अवघ्या तीन धावा दूर असताना माझ्या शतकाची आठवण करून दिल्यामुळे मी बाद झाल्याचे गंभीरने म्हटले आहे.
धोनीवर गौतमचा ‘गंभीर’ आरोप
गौतम गंभीर २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील श्रीलंकेविरूद्ध झालेल्या अंतिम सामन्यात ९७ धावांवर बाद झाला होता. गंभीर म्हणाला, हा प्रश्न मला बर्याच वेळा विचारण्यात आला की जेव्हा ९७ धावांवर मी होतो तेव्हा काय झाले. ही धावसंख्या गाठण्यापूर्वी मी माझ्या वैयक्तिक धावसंख्येचा कधीच विचार केला नव्हता. मी माझ्या मनात फक्त श्रीलंकेचे लक्ष्य ठेवले होते. मला आठवते की, षटक संपल्यावर धोनी आणि मी क्रीजवर होतो. मला त्याने सांगितले की तीन धावा बाकी आहेत, या तीन धावा कर आणि तुझे शतक पूर्ण होईल.
जेव्हा आपले मन अचानक आपल्या वैयक्तिक कार्यक्षमतेकडे जाते, तेव्हा कुठेतरी आपल्याला थोडेसे घाबरल्यासारखे जाणवते. माझे लक्ष्य यापूर्वी फक्त श्रीलंकेच्या धावसंख्येचा पाठलाग करण्यावर होते. जर तेच लक्ष्य माझ्या मनात राहिले असते तर मी सहजपणे माझे शतक ठोकले असते, असे गंभीरने म्हटले आहे. गंभीरच्या या प्रतिक्रियेवर चाहत्यांनी त्याला ट्रोल केले आहे.
