
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे विधानसभेचा कालावधी संपण्याच्या एक दिवस आधी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी मित्रपक्ष शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेला देण्याचा शब्द भाजपने कधीच दिला नव्हता. त्याचबरोबर भाजपच पुढचे सरकार स्थापन करेल, असा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केला.
फडणवीस यांनी बोलून दाखवली शिवसेनेबद्दल मनातील खदखद
सर्व पर्याय खुले असल्याची भूमिका सर्वात आधी शिवसेनेने घेतली. मी वारंवार उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी एकदाही फोन घेतला नाही. आमच्याशी चर्चा करण्याऐवजी शिवसेनेने रोज काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा केली. आमच्याशी चर्चा न करण्याचे धोरण चुकीचे असल्याची शिवसेनेनेबद्दल उघड नाराजी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. चर्चेतून समज-गैरसमज दूर होऊ शकतात. विरोधकांनी जितके घाव केले नाहीत, तितके घाव शिवसेनेने केले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ज्या भाषेत शिवसेना बोलत आहेत, त्या भाषेत आम्हीही उत्तर देऊ शकतो. पण आमची मर्यादा आम्ही कधीही ओलांडली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरची शिवसेनेची टीका विखारी होती. पण दिवंगत बाळासाहेब ठाकरेंबद्दल आम्ही कधीही चुकीचे वक्तव्य केले नाही. आमच्यासाठी बाळासाहेब पुज्यनीय आहेत. तसेच उद्धव ठाकरेंवरही आम्ही कधी टीका केली नाही. आम्ही आमच्या मर्यादा कधीही ओलांडल्या नाहीत, याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली. मीडियापासून गेल्या 15 दिवसांपासून दूर असलेले देवेंद्र फडणवीस आज राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदा मीडियासमोर आले. यावेळी शिवसेनेबद्दल मनातील खदखद फडणवीस यांनी बोलून दाखवली.
