संजय राऊत पुन्हा शरद पवारांच्या भेटीला


मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसतानाच पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. संजय राऊत यांनी पवार विरोधी पक्षात बसण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. दोघांची भेट पवारांच्या पत्रकार परिषदेआधी ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी झाली. नऊ मिनिटांच्या भेटीनंतर राऊत ‘मातोश्री’कडे रवाना झाले.

शरद पवारांना मी भेटलो, ही नेहमीप्रमाणे सदिच्छा भेट होती. पवारांनी राज्यातील अस्थिर परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधात बसण्याचा कौल जनतेने दिल्यामुळे आपण विरोधी बाकावर बसणार असल्याचे पवारांनी सांगितल्याचे संजय राऊत म्हणाले.

राऊतांनी 31 ऑक्टोबरला पवारांची भेट घेतली होती. ही भेट दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी घेतल्याचे संजय राऊत यांनी त्यावेळी सांगितले होते. कोणतीही राजकीय चर्चा या भेटीत झाली नसल्याचेही राऊत म्हणाले होते. आता सत्तास्थापनेचे घोंगडे भिजत असताना राऊत-पवारांची पुनर्भेट राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फोडण्यास पुरेशी आहे.

मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेनेकडे अनेक पर्याय असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीचे नेते मदत करण्यास सकारात्मक असल्याचीही चर्चा आहे. अशा सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत पुन्हा शरद पवारांची भेट घेणे भुवया उंचावणारे आहे.

Leave a Comment